अमली पदार्थांचे सेवन करून तरुणांचा धिंगाणा, कारवाईची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या प्लास्टिकचे युग आले आहे. त्यामुळे चैनबाज असलेले तरुण शिवारातच पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. त्यावेळी प्लास्टिकचे ग्लास, बॉटल, शिवारामध्ये फेकून देत आहेत. काचेच्या बॉटल असतील तर त्या फोडल्याही जात आहेत. वारंवार शिवारामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यावर आता पोलिसांनीच नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शिवारामध्ये तरुण पार्ट्या आयोजन करताना दारू ढोसत आहेत. सिगारेटदेखील पिऊन तेथेच टाकून देत आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा गवतगंजींना आगदेखील लागत आहे. जुगारदेखील जोरात सुरू आहे. तर काही तरुण गांजा पिऊन भांडणे काढताना दिसत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. महिलावर्ग तर शेतकऱ्यांकडे जाणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे अक्षरश: शेतकरी कंटाळले आहेत.
या तरुणांच्या त्रासाबरोबरच कुत्र्यांच्या त्रासालाही शेतकरी कंटाळले आहेत. कुत्र्यांचे कळप शेतामध्ये जाऊन ठाण मांडू लागले आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या असलेल्या कडधान्य पिकांमध्ये कुत्र्यांचे कळप ठाण मांडून बसत आहेत. एकूणच शेतकरी या प्रकाराने हैराण झाला आहे. आता 31 डिसेंबर असून पुन्हा पार्ट्यांचा पेव वाढणार आहे. तेंव्हा अतिउत्साही तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.









