अजूनही काही ठिकाणी मशागतीच्या कामांना गती नाही : साऱ्यांच्या नजरा आभाळाकडे
बेळगाव : यावर्षी वळिवाने केवळ एकदाच वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची अजूनही प्रतिक्षा लागली आहे. तर काही ठिकाणी पेरणी व मशागतीची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, पावसाचा अजूनही पत्ता नसल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कधी एकदा पाऊस येणार, अशी आशा आता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. तर अजूनही तालुक्यातील काही ठिकाणी मशागतीच्या कामांना चालना देण्यात आली नाही. यावर्षी वळिवाचे आगमन हे चिंताजनकच ठरू लागले आहे. जर जून महिन्यात मान्सून बरसला तर शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार होते. मात्र, आता जूनअखेर आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बरसणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, दरवेळीप्रमाणे त्यांचा अंदाज हा शेतकऱ्यांना मारक ठरला आहे. काही दिवसांपूर्वी शहर परिसरात वळिवाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा एक थेंबही पडला नाही. आशा पल्लवीत करून शेतकऱ्यांना पुन्हा निराशेच्या खाईत झोकून दिल्याचाच हा प्रकार आहे.
जून महिन्यातही नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतच आहे. परिणामी, उष्म्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडणेच बंद करत आहे. तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागात पेरणीच्या कामाला गती मिळाली होती. पण पाऊस नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही शेतकरी मशागती करून पेरणी केली होती. मात्र, आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे केलेला खर्च व वेळही वाया गेला आहे. तर काहींनी अजूनही मशागतही केली नाही. साऱ्यांच्या नजरा आता पावसाकडेच लागून राहिल्या आहेत. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचे भात पीक तसेच कडधान्यही पावसाच्या कचाट्यात सापडली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. हिंवाळ्याबरोबरच उन्हामध्येही पावसाने चांगलेच झोडपले होते. परिणामी, अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी मात्र तसे काहीच झाले नाही. उलट यावर्षी केवळ एक किंवा दोनदाच पावसाने हजेरी लावली असून तेही मोठ्या प्रमाणात नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी सध्या खरीप हंगामाच्या तयारी केली होती. भात पेरणीसाठी शिवार सज्ज करण्यात येत आहे. काहीजण धूळवाफ पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कधी एकदा पाऊस येतो आणि कधी कामे पूर्ण होणार, अशा विवंचनेत शेतकरी आहेत.
मान्सूनने साथ दिल्यास सोयीचे ठरणार
तालुक्यातील उत्तर आणि पश्चिम भागात पावसाची प्रतीक्षा आहे. कारण अजूनही अनेक पिके शेतात आहेत. याचबरोबर जर मान्सूनने चांगली साथ दिली तर त्या ठिकाणी सोयीचे ठरणार आहे. कारण विशेष करून या भागात पेरणी ऐवजी नट्टी लावण्यावर भर दिला जातो. मात्र, त्या ठिकाणीही विहिरींनी तळ गाठला असून असलेल्या पिकांना पाणी देणे कठीण बनत चालले आहे. जूनच्या मध्यावतीपर्यंत बेळगावचा पारा 35 अंशावर होता. त्यामुळे सर्वांनाच उन्हाचे चटके आता नको नकोसे वाटू लागले आहेत. बेळगाव तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.









