तालुक्मयात 10 हजार हेक्टर शेतीत ऊस लागवड
वार्ताहर /नंदगड
गेल्या चार दिवसापासून तालुक्मयात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने उसाला रासायनिक खते घालण्यात तालुक्मयातील शेतकरी व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतीवर आधारित मजूर शेतवडीत दिसत आहेत. खानापूर तालुक्मयातील 10 हजारांहून अधिक हेक्टर जमिनीत ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे. मलप्रभा नदीकाठावरील शेतवडीत तसेच खानापूर तालुक्मयाच्या पूर्वभागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सध्या ऊस वाढीसाठी युरिया व अन्य रासायनिक खताची उसाला गरज आहे. त्याची तजवीज करून शेतकरी मजुरांद्वारे उसाला खत घालण्यात व्यस्त आहेत.
बोअरवेलच्या पाण्याचा वापर
मलप्रभा नदीकाठावरील गावच्या शेतवडीत मलप्रभा नदीचे पाणी मोटारीद्वारे खेचून उसाला देण्याची सोय झाल्याने नदीकाठावरील शेतवडीत उसाची लागवड करण्यात आली. तालुक्मयाच्या पूर्वभागातील इटगी, पारिश्वाड, गंदीगवाड, हिरेमुनवळ्ळी, हिरेहट्टीहोळ्ळी, चापगाव आदी भागात गेल्या 30 ते 40 वर्षापासून उसाची लागवड करण्यात येते. तालुक्मयाच्या पश्चिम भागात माळरानावर अनेक शेतकऱ्यांनी बोअर मारल्या आहेत. त्या बोअरवेलीच्या पाण्याच्या सहाय्याने पडीक जमिनीत आता शेतकरी उसाची पिके घेत आहेत. दर चांगला मिळत असल्याने पडीक जमिनीत ऊस घेऊन चार पैसे हाताला येत असल्याने शेतकरी सुखी झाला आहे.
पारंपरिक पिकांना फाटा
लिंगनमठ, भुरुणकी, गोधोळी, मंग्यानकोप, बिडी, नंजिनकोडल, बेकवाड परिसरातील जमिनीत बोअरवेल मारल्यानंतर मुबलक पाणी मिळत असल्याने या भागातील शेतकरी पारंपरिक भुईमूग, मका, जोंधळा, नाचणा ही पिके घेण्याऐवजी त्या जमिनीत आता ऊसपीक घेत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी काहीअंशी सधन झाला आहे. अलीकडच्या काही वर्षात खानापूर येथील भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना अस्तित्वात आल्याने या भागातील उसाची उचल होत आहे. शिवाय बेळगाव जिह्यातील अन्य कारखान्यांकडून तसेच महाराष्ट्रातील साखर कारखाने तसेच हल्याळ व गोवा येथील कारखान्यांकडून उसाची उचल करण्यात येत आहे. त्यामुळे वेळेत ऊस जात असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.









