3 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप : आठ दिवसांत सहा वर्षांचा मागितला हिशेब
प्रतिनिधी /फोंडा
मडकई येथील बार आम्रेखाजन या खाजनशेतीच्या व्यवहारात अंदाजे रु. 3 कोटींचा आर्थिक गैरव्यहार झाल्याचा आरोप करीत शेतकरी आक्रमक बनले आहेत. गेली सहा वर्षे शेती व्यवस्थापन समितीने जमाखर्च सादर केलेला नाही व त्यांच्याच निष्काळजीपणामुळे बंधाऱयाला भगदाड पडून शेती उत्पादन धोक्यात आल्याचा आरोप शेतकऱयांनी केला. काल रविवारी मामलेदारांच्या उपस्थितीत हिशेब सादर करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी शेतकऱयांनी केली होती. यावेळी अध्यक्ष, सचिव व खजिनदार उपस्थित होते. पण त्यांनी हिशेब मांडण्यास असमर्थता दाखविल्याने मोठय़ासंख्येने जमलेले शेतकरी आक्रमक बनले.
दक्षता खात्यामार्फत चौकशीची मागणी
मामलेदारांकडे हिशेब व शेतीसंबंधी इतर समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी अनेक वेळा मागणी करुनही त्यांच्याकडून कुठलाच पाठपुरावा होत नसल्याने दक्षता खात्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे. आम्रेखाजन शेती व्यवस्थापन समितीला हिशेब सादर करण्यासाठी रविवार 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. येत्या रविवारी बैठक बोलावून त्यात ऑडिट अहवाल, बँक खात्याच्या जमा खात्यातील संपूर्ण तपशिल, शेतीची कामे झाल्यास त्याचे व्हॉवचर सादर करण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये शेती व्यवस्थापन समिती बदलण्यात आलेली नाही. आर्थिक गफला केल्यानेच समितीची निवडणूक घेण्यात आलेली नाही, असा आरोपही शेतकऱयांनी केला.
शेती व्यवस्थापन समितीची विसंगत उत्तरे
यावेळी आम्रेखाजन शेती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावडे, सचिव दयानंद नाईक व खजिनदार नारायण गावडे हे उपस्थित होते. त्यांनी आर्थिक ऑडिट न होण्यास मागील म्हणजे सहा वर्षांपूर्वीच्या समितीवर ठपका ठेवला आहे. पण प्रसारमाध्यमांसमोर बोलताना हिशेब रखडण्यामागे त्यांना सुसंगत उत्तरे देता आली नाही. तसेच शेतीच्या बांधाला अचानकपणे भगदाड पडले व दुरुस्तीकामासाठी समितीकडे पैसे नसल्याने शेती खाऱया पाण्याखाली गेल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आम्रेखाजन शेतीत सहाशे शेतकरी आहेत. त्यापैकी किमान दोनशे शेतकऱयांनी सहय़ा केल्याशिवाय हिशेब सादर करता येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
बांधाच्या दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, मग लाखो रुपये गेले कुठे ?
शेतकऱयांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी मत्स्य उत्पादनासाठी रु. 25 ते 30 लाखांची पावणी जाते. याशिवाय सरकारकडून सबसिडीची रक्कमही मिळते. बचत व ठेवींवरील गेल्या काही वर्षांचा हिशेब केल्यास किमान 3 कोटींची रक्कम बँक खात्यात जमा असायला हवी. पण प्रत्यक्षात 3 हजार रुपयेच एका बँक खात्यात दिसतात, अशी माहिती शेतकऱयांनी दिली. त्यामुळे गेल्या सहा वर्षांच्या हिशेबाची चौकशी करण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे. महिन्या भरापूर्वी शेतीच्या बांधाला भगदाड पडून खारे पाणी शेतीत घुसले आहे. त्यामुळे यंदा वायंगणी शेती लावता आली नाही. काही शेतकऱयांनी भाजी व मिरचीची लागवड केली होती. तिही पाण्याखाली गेल्याचे शेतकऱयांनी सांगितले.









