वीज दरवाढीबाबत आक्षेप बैठक : लाईनमनची संख्या वाढविण्याची मागणी
बेळगाव : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विहिरी तसेच कूपनलिकांना वीजपुरवठा गरजेचा असतो. नवीन कनेक्शन घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर घेण्याची सूचना केली जात आहे. हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने कर्नाटक विद्युत नियामक मंडळ (केईआरसी)कडे बैठकी दरम्यान करण्यात आली. दरवाढीसंदर्भात केईआरसीने हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी हुबळी, धारवाड, बेळगाव येथील शेतकरी, लघुउद्योजक उपस्थित होते.
यावर्षी हेस्कॉमने दरवाढीसाठी प्रति युनिट 69 पैसे वाढीचा प्रस्ताव केईआरसीकडे पाठविला असल्याची माहिती हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक वैशाली यांनी दिली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली. दरवाढ करा परंतु सुरळीत व चांगल्या दर्जाचा वीजपुरवठा करण्याची मागणी केईआरसीकडे करण्यात आली. केईआरसीचे चेअरमन रवीकुमार यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सूचना केल्या. ग्रामीण भागात लाईनमनची संख्या कमी असून ती वाढवावी, असे सांगण्यात आले. यावेळी केईआरसी तसेच हेस्कॉमचे पदाधिकारी उपस्थित होते.









