दिल्लीच्या दिशेने पायी कूच करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विविध मागण्यांवरून पंजाब आणि हरियाणाचे काही शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी संघटनांनी स्वत:च्या आंदोलनाला तीव्र करत 21 जानेवारी रोजी पुन्हा हरियाणा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे. यात 101 शेतकऱ्यांचा समूह सामील असेल, ज्यांना ‘मरजीवडा’ नाव देण्यात आले आहे. मरीजवडाचा अर्थ स्वत:चा जीव देण्यासाठी तयार असलेले असा होतो.
यापूर्वी 2021 मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांकडून 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान निदर्शकांनी पोलीस बॅरिकेडिंग तोडून दिल्लीत प्रवेश केला होता. निदर्शकांनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरील तिरंगा हटवून स्वत:चा झेंडा फडकविला होता. परंतु नंतर तो झेंडा हटविण्यात आला होता आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत या निदर्शकांना पिटाळून लावण्यात आले हेते.
मागील वर्षाच्या 13 फेब्रुवारीपासून आंदोलन करणारे शेतकरी शंभू सीमेवरून दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांनी तीनवेळा दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात ते अपयशी ठरले होते. केंद्र सरकार आमच्यासोबत चर्चा करण्याच्या मूडमध्ये असल्याचे वाटत नाही. आमचा 101 शेतकऱ्यांचा समूह 21 जानेवारी रोजी आणखी एक प्रयत्न करेल. आता आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात का आम्हाला मारून टाकावे हे सरकारवर असल्याचे वक्तव्य किसान मजदूर मोर्चाचे संयोजक सरवन सिंह पंधेर यांनी गुरुवारी केले आहे.









