शेतकऱ्यांचे आमरण उपोषण : अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट न घेतल्याने संताप
वार्ताहर /सांबरा
मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून गुरुवारपासून शेतकऱ्यानी छेडलेले आंदोलन सुरूच आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट न घेतल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील युवा शेतकरी सचिन पाटील यांनी आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. तर इतर असंख्य शेतकरी धरणे आंदोलनाला बसले आहेत. आमरण उपोषण व धरणे आंदोलनाचे अस्त्र उगारून चार दिवस उलटले तरी अद्याप एकाही अधिकाऱ्याने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या सचिन पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या सर्व गोष्टींचा संचालक मंडळाने खुलासा करावा व संबंधित अधिकाऱ्यांनी संघाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
रमाकांत कोंडुस्कर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
दरम्यान रविवारी रमाकांत कोंडुस्कर यांनी युवा शेतकरी सचिन पाटीलसह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या व याबाबत सोमवार दि. 6 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी व सहकार खात्याचे जिल्हा नोंदणी अधिकारी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.









