गाजराला कमी भाव दिल्याने उत्पादक शेतकरी संतप्त
बेळगाव : स्थानिक गाजर उत्पादक शेतकऱ्यांच्या गाजराला योग्य भाव मिळत नसल्याने गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी जय किसान भाजी मार्केटच्या दारात आंदोलन छेडले. हातात झाडू घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी गेटसमोर झोपून निदर्शने केली. शिवाय गाजराला योग्य भाव द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे. जय किसानमध्ये इंदोर, नागपूर, बेंगळूर येथून गाजराची आवक वाढवली जात आहे. त्यामुळे स्थानिक गाजरांना योग्य भाव मिळेनासा झाला आहे. प्रति 10 किलो 450 ते 500 रुपये असणारा गाजराचा दर 150 रुपयांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक गाजर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे गाजराला योग्य भाव मिळावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी सरकार आणि दलालांच्या विरोधात घोषणा देऊन शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
बेळगाव परिसरातील 50 हून अधिक गावांमध्ये गाजर उत्पादन घेतले जाते. अलीकडे गाजर उत्पादनात वाढही झाली आहे. स्थानिक गाजर उपलब्ध असताना मार्केटमधील व्यापारी आणि दलालांकडून इतर राज्यातून गाजर आणली जात आहेत. त्यामुळे स्थानिक गाजरांना म्हणावा तसा भाव मिळेनासा झाला आहे. आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. दरम्यान निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याच्या भावनाही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सरकार, कृषी खाते आणि बागायत खात्याचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने पिळवणूक होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दि. 1 फेब्रुवारी रोजी जय किसान भाजी मार्केटमध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत गाजराच्या भावाबाबत चर्चा केली जाणार आहे. गाजराच्या दराबाबत तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. विक्रेते, दलाल, शेतकरी व एपीएमसीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.









