कणकुंबी भागातील सहा महिन्यातील चौथी घटना
वार्ताहर/कणकुंबी
तालुक्यातील पश्चिम भागातील हुळंद येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे (वय 60) यांच्यावर रविवारी सायंकाळी अस्वलाने अचानक हल्ला केल्याने या हल्ल्यात गावडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी बेळगावातील बिम्स येथे दाखल करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील सहा महिन्यातील अस्वल हल्ल्याची ही चौथी घटना आहे. वनखात्याच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अस्वल आणि इतर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, हुळंद येथील शेतकरी वासुदेव गावडे हे रोजच्याप्रमाणे आपली जनावरे चरावयास घेऊन गेले होते. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान जनावरे घरी घेऊन येत असताना गावाजवळच अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गावडे यांना काही समजले नाही. मात्र त्यांनी अस्वलाशी सामना केला. मात्र या हल्ल्यात चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांचा डावा डोळा व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. अस्वलाबरोबर दोन पिल्ले असल्याने अस्वल अधिक आक्रमक झाल्याने गावडे यांना तीव्र जखमा झाल्या आहेत. अशाही अवस्थेत त्यांनी आपली अस्वलाकडून सुटका करून घर गाठले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती कणकुंबी वनखात्याला दिली. कणकुंबी वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने हुळंद येथे दाखल होऊन गावडे यांना रुग्णवाहिकेतून कणकुंबी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत विभागीय वनाधिकारी सुनीता निंबरगी यांनी सांगितले की, जखमीवर योग्य उपचार करण्यात येतील. तसेच तातडीने आर्थिक मदतही मिळवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.









