चिगुळे येथील घटना : उपचारासाठी केएलई इस्पितळात दाखल
वार्ताहर/कणकुंबी
चिगुळे येथील शेतकरी अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी गुढीपाडव्या दिवशी सकाळी 8 वाजता घडली. विलास हेमाजी चिखलकर (वय 55) असे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते, परंतु गंभीर जखमी असल्याने त्यांना केएलई इस्पितळात हलविण्यात आले आहे. विलास चिखलकर हे रविवार दि. 30 रोजी गुढीपाडव्या दिवशी सकाळी गावापासून जवळच असलेल्या आपल्या शेताकडे गेले होते. शेतात असलेल्या आपल्या झोपडीत त्यांनी नेहमीप्रमाणे प्रवेश केला.
परंतु झोपडीत पूर्वीच एक अस्वल आपल्या दोन पिल्लासह दबा धरून बसले होते. विलास चिखलकर हे झोपडीत प्रवेश करताच अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा डाव्या बाजूचा संपूर्ण जबडा फाडून टाकला आहे. तसेच हाता-तोंडाला व डोक्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी अवस्थेत कशीबशी धडपड करून आपल्या शेतापासून मुख्य रस्त्यापर्यंत आले. चिगुळे गावातील शंकर सुतार हे कणकुंबीला जात असताना त्यांनी गंभीर जखमी झालेल्या विलास चिखलकर यांना पाहून लगेच वनखात्याला सदर घटनेची माहिती दिली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना बेळगावच्या सरकारी इस्पितळात दाखल केले. परंतु ते गंभीर जखमी असल्याने त्यांना केएलई इस्पितळात हलविण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांतील दुसरी घटना
कणकुंबी वनक्षेत्रात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात माण गावच्या शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विलास चिखलकर यांना माण गावच्या शेतकऱ्याप्रमाणे आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









