सरकारी प्रतिनिधींनी चर्चा न केल्याने नाराजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आंदोलक आता अधिकच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. शेतकरी नेत्यांशी बोलणी करण्यासाठी सरकारी प्रतिनिधी न फिरकल्यामुळे आता आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने शनिवारी सायंकाळी हरियाणा-पंजाब शंभू सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा होत असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे आता आंदोलक शेतकरी रविवारी दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहेत. रविवार, 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांचा एक गट शांततेने दिल्लीकडे कूच करेल, असे शेतकरी संघटनांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याआधी केंद्र सरकारकडून चर्चेचा काही प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करण्याची तयारीही शेतकरी नेत्यांनी दर्शवली आहे. दुसरीकडे, अंबालामध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पिकांना किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी द्यावी, वीजदरात वाढ करू नये, कर्जमाफी द्यावी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन द्यावी अशा मागण्या करत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारकडे आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत. दिल्लीच्या गाझीपूर आणि सिंघू सीमेवरही काही शेतकरी संघटना जमल्या आहेत. याचदरम्यान शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी शंभू सीमेवर शनिवारी पत्रकार परिषद घेतली. शेतकरी आंदोलन सुरू होऊन आज 299 दिवस झाले आहेत. खन्नौरी हद्दीतील डल्लेवाल यांच्या उपोषणाला 12 दिवस झाले आहेत. शुक्रवारी पोलिसांच्या कारवाईत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. एकूण 16 शेतकरी जखमी झाले आहेत. 4 शेतकरी वगळता उर्वरितांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण आलेले नाही. रविवार, 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता 101 शेतकऱ्यांचा पहिला गट शांततेत दिल्लीकडे जाईल. कोणत्याही शेतकऱ्याकडे शस्त्रs नसतील. शेतकऱ्यांकडे शस्त्रs असल्याचा खोटा आरोप हरियाणा पोलीस करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
शेतकरी आंदोलकांवरील पोलिसांच्या कारवाईमुळे केंद्र सरकार आणि भाजपचा चेहरा सर्वांसमोर आला आहे. नि:शस्त्र शेतकऱ्यांना पायी दिल्लीला जाण्यापासून रोखले जात आहे. किमान आधारभूत किमतीच्या निम्मी रक्कम दिली जात असल्याचे सरकार गृहीत धरत आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान देशाला गोंधळात टाकत आहेत, असेही पंढेर यांनी सांगितले









