मोर्चादरम्यान बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न : पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांना या सीमेवरून दिल्लीकडे कूच करायचे होते. मात्र, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनीही ठोस व्यवस्था केली होती. पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यास सुरुवात केली. याचदरम्यान केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेमध्ये एमएसपीसंबंधी मोठी घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी आपले दिल्लीकडील मार्गक्रमण रोखले आहे. सध्या शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबालामधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अंबाला येथील डांगडेहरी, लोहगड, मानकपूर, दादियाना, बारी घेल, लहर्स, कालू माजरा, देवी नगर, सदोपूर, सुलतानपूर आणि काकरू येथे इंटरनेट बंद राहणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणा सरकारने हा आदेश जारी केला आहे. सरकारने आजपासून म्हणजेच 6 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत या सर्व भागातील इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रेटर नोएडातील परी चौकात विविध आघाड्यांवरील शेतकरी संघटना निदर्शने करत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. याचदरम्यान परी चौकात पोहोचलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शंभू सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलीस पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसत आहे. पाण्याचे टँकर, पोलीस बंदोबस्त यासह सर्व व्यवस्था पोलिसांनी केली आहे. शंभू सीमेवरून पोलिसांच्या तयारीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत.









