एकंबे :
कोरेगाव ते रहिमतपूर दरम्यान कोरेगाव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरंबे येथे गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी पाच ते सहा घरांची कुलुपे तोडून चोरी करण्यात प्रयत्न केला. मात्र जागरूक शेतकऱ्यांमुळे तो अयशस्वी ठरला. चिडलेल्या चोरट्यांनी विठ्ठल शंकर नवले या शेतकऱ्याच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तेथून पळ काढला. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरंबे येथील विकास जाधव, नवनाथ भोसले, महादेव भोसले, अतुल भोसले, बाबाजी भोसले व दीपक पवार यांच्या घराचे कुलपे चोरट्यांनी कापली आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापैकी नवनाथ भोसले हे मुंबई पोलीस बलात कार्यरत आहे. यादरम्यान शेतकरी विठ्ठल शंकर नवले व अन्य शेतकरी हे जागे झाले. त्यांची हालचाल पाहून चोरटे संतापले आणि त्यांनी नवले यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि जवळ असलेल्या शेतातून पसार झाले.
नवले यांनी तातडीने याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर नवले यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांना माहिती दिल्यानंतर रहिमतपूर पोलिसांचे पथक शिरंबे येथे दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे सापडलेले नाहीत.
एकूणच ऐन पावसाळ्यात चोरट्यांनी आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची विशेष करून गावाबाहेर वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरांवर चोरीसाठी लक्ष केंद्रित केले असल्याचे शिरंबे येथील घटनेवरून दिसून आले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कोरेगाव तालुक्यात रात्रगस्त वाढविण्याबाबत तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
..








