बिनव्याजी कर्ज देण्याची डीसीसी बँकेला जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : तरीही आंदोलन सुरूच
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, गुरुवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता. दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र शेतकरी वर्ग आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, संघाचे गेल्या बऱ्याच वर्षापासून ऑडिट झाले नव्हते. शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याने सध्या संघाचे सरकारी ऑडिट करण्यात आले आहे व हे काम पूर्ण झाले असून, ऑडिट रिपोर्ट डीसीसी बँकेला पाठविण्यात आला आहे व पुढील निर्णय बँकचे संचालक मंडळ घेईल. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली. मात्र जोपर्यंत खात्यावर बिनव्याजी कर्ज जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी डीसीसी बँकेच्या संबंधितांना बिनव्याजी कर्ज वितरण करण्यासंदर्भात कळविण्याचे सांगितले. त्यामुळे आता डीसीसी बँकेच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून, गुरुवारी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला होता.









