हिरेबागेवाडीतील घटना : खुनाचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
आजारपणामुळे जनावरांचे चारापाणी केले नाही म्हणून एका वृद्धाचा खून करण्यात आला आहे. हिरेबागेवाडी येथे ही घटना घडली असून यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भीमाप्पा निंगाप्पा केंडप्पन्नावर (वय 65) राहणार नेकार गल्ली, हिरेबागेवाडी असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. भीमाप्पा हे नागनगौडा गौडाप्पा पाटील यांच्या घरी भाड्याने रहात होते. त्यांच्याच शेतात काम करीत होते. शेतीची कामे व जनावरांची व्यवस्था करीत होते. आजारपणामुळे ते कामावर गेले नाहीत. म्हणून राग अनावर झालेल्या मालकाने त्यांचा खून केला आहे.
गुरुवार दि. 1 मे रोजी सायंकाळी 4 वाजता आजारपणामुळे भीमाप्पा हे आपल्या घरी झोपले होते. ते ज्या शेतात काम करीत होते, त्याचा मालक नागनगौडा पाटील हा त्यांच्या घरीच आला. गायीला पाणी का पाजला नाहीस? त्यांना चारा का घातला नाहीस? अशी विचारणा करीत ‘तू जगलास काय आणि मेलास काय’, असे म्हणत त्याला तुडवले. खासगी इस्पितळात उपचार करून घेऊन दुसऱ्या दिवशी हिरेबागेवाडी येथील समुदाय आरोग्य केंद्रात भीमाप्पावर उपचार करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल व तेथून हुबळी येथील किम्सलाही हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता शनिवारी सकाळी भीमाप्पाचा मृत्यू झाला. हुबळी येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी किम्सला भेट देऊन कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली. भीमाप्पाचा मुलगा हणमंत केंडप्पन्नावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनगौडा पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुर्दैवी…
? जनावरांचे चारापाणी केले नाही म्हणून केली मारहाण?
? हुबळीतील किम्समध्ये उपचार सुरू असताना मृत्यू









