दुहेरी खुनाच्या घटनेने हुक्केरी परिसर हादरला : यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
बेळगाव : शेतीवाडीतील घरात राहणाऱ्या एका शेतकरी दाम्पत्याचा भीषण खून करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी मावनूर, ता. हुक्केरी येथे हा खुनाचा प्रकार उघडकीस आला असून या दाम्पत्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. दुहेरी खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. गजेंद्र इराप्पा हुन्नुरी (वय 60), त्यांची पत्नी द्राक्षायणी गजेंद्र हुन्नुरी (वय 48) दोघेही राहणार मावनूर अशी खून झालेल्या दुर्दैवी दाम्पत्याची नावे आहेत. शनिवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून या दाम्पत्याचा बळी घेण्यात आला आहे. शुक्रवार दि. 7 जुलैच्या रात्री 8 पासून शनिवार दि. 8 जुलैच्या सकाळी 8 या वेळेत हा भीषण खून करण्यात आला आहे. त्यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यमकनमर्डी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती समजताच यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सुरुवातीला पाच्छापूर पोलीस आऊटपोस्टला यासंबंधी माहिती मिळाली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती कळविली होती.
दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
उपलब्ध माहितीवरून शुक्रवार दि. 7 जुलै रोजी रात्री या दाम्पत्याला अनेकांनी शेवटचे भेटले आहे. शनिवारी दाम्पत्य घराबाहेर पडले नाही. म्हणून शेजारील शेतकऱ्यांनी त्यांच्या घरात डोकावले असता गजेंद्र व त्यांची पत्नी द्राक्षायणी यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या दाम्पत्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नसला तरी यमकनमर्डी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत यासंबंधी ठोस माहिती बाहेर पडली नाही. तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.









