इंग्रजी भाषा ही शहरातील लोकांनाच माहीत असते आणि तेच फर्डे इंग्रजी बोलू शकतात अशी आपली आजही समजूत आहे. पण ती किती चुकीची आहे, हे एका महिलेने सिद्ध केले आहे. आपण कोठे राहतो यावर आपली बुद्धीमत्ता किंवा ज्ञान अवलंबून नसते. तर ज्ञान हे आपली ते मिळविण्याची आस किती प्रबळ आहे, यावरच अवलंबून असते, असेही अनेकदा स्पष्ट झालेले आहे.
उत्तर प्रदेशच्या सिराथू येथील एक महिला यशोदा लोधी असे या महिलेचे नाव आहे. ती केवळ 12 वी उत्तीर्ण आहे. पण शहरातील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या कोणासही लाजवेल अशा प्रकारे ही महिला इंग्रजी अस्खलित बोलते. इतकेच नव्हे, तर युट्यूबवर इंग्रजीच्या शिकवण्याही चालवते. या महिलेचे व्यक्तीमत्वही फारसे विशेष नाही. प्रथमदर्शनी ती केवळ एक साधीसुधी ग्रामीण महिलाच वाटते. पण तिने इंग्रजी बोलण्यास प्रारंभ केला की भल्याभल्यांची मती गुंग होऊन जाते.
ही महिला पंचक्रोशीत तिच्या मूळ नावाने ओळखलीच जात नाही. साऱ्यांनी तिचे नामकरण ‘देहाती मॅडम’ असे केले आहे. ही महिला कोठेही नोकरी करत नाही. ती केवळ एक गृहिणी आहे. तथापि, तिला इंग्रजीचा छंद लहानपणापासूनच लागला. शिक्षण कमी असूनही तिने इंग्रजीचा अभ्यास केला. आज तिला या भाषेचे काही हजार शब्द ज्ञात आहेत, असे बोलले जाते. तिने इंग्रजी व्याकरणाचाही अभ्यास केला आहे. त्यामुळे अचूक इंग्रजी बोलण्याचे कौशल्य तिने साध्य केले आहे. अनेकांच्या मनात इंग्रजी भाषेची अनहूत भीती असते. त्यामुळे ते शक्यतो या भाषेचा उपयोग टाळतात. पण या महिलेला तसे कोणतेही भय किंवा धास्ती वाटत नाही. अगदी नैसर्गिकरित्या ती इंग्रजी बोलते, असे निरीक्षण अनेकांनी नोंदविले आहे. तिचे हे फाडफाड इंग्लिश आता सोशल मिडियावरुन लक्षावधी लोकांपर्यंत पोहचले आहेत. ती आता कौतुकाचा विषय बनली आहे. इंग्रजी भाषेच्या अनेक तज्ञांनी तिची प्रशंसा केली असून तिचा आदर्श अनेकांनी घेतला आहे. प्रतिदिन अनेक लोक तिचे इंग्रजी ऐकण्यासाठी तिला भेटायला येत असतात.









