लग्न, मुंज किंवा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी मिरवणूक काढली जाण्याची प्रथा भारतात सर्वत्र आहे. लग्नातली वरात तर अगदी सर्वसामान्य आहे. ही वरात किंवा मिरवणूक नुसती नसते. तर तिच्यासह बेंडबाजा असावा लागतोच. या बेंडबाजालाच अलिकडच्या भाषेत ‘डीजे’ म्हणतात. ढणढणाट करणारा हा डीजे ही प्रत्येक मिरवणुकीची जणू अनिवार्यता बनला आहे. अशी सवाद्य मिरवणूक देवाच्या मूर्तींची काढली जाते, किंवा मंगलप्रसंगी माणसाची काढली जाते. इतिहासप्रसिद्ध महनीय व्यक्तींच्या जयंतीलाही अशी डीजेसहित मिरवणूक काढणे प्रचलित आहे.
तथापि, महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातील धीरज जिगे नामक तरुण शेतकऱ्याने आपल्या उसाची अशी मिरवणूक काढली. ही मिरवणूक त्याचे शेत ते साखर कारखाना अशी निघाली. या मिरवणुकीत डीजे ची व्यवस्थाही करण्यात आली होती. स्वत: शेताचा मालक या मिरवणुकीच्या अग्रभागी नाचत होता. त्याच्या समवेत त्याचा मित्रपरिवार, कुटुंबातील लोक, नातेवाईक आदी सारेच या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशी वाजत गाजत ही उसाची मिरवणूक कारखान्या पर्यंत पोहचली आणि तेथ या उसाला निरोप देण्यात आला.
यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने जालना जिल्ह्यात उसाचे पीक बहरले आहे. त्यामुळे ऊस उत्पादन शेतकरी आनंदात आहेत. या आनंदाचे प्रदर्शन करण्यासाठी उसाची मिरवणूक काढण्याची कल्पना जिगे यांना सुचली आणि त्यांनी ती लगोलग आचरणातही आणली. ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये कापणी झालेला ऊस भरण्यात आला आणि तो घेऊन वाजतगाजत ही मिरवणून निघाली. कारखान्याच्या कर्मचारीवर्गानेही ती कारखान्यापर्यंत पोहचल्यानंतर तिचे जोरदार स्वागत केले. हा प्रकारच अद्भूत होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.









