कोल्हापूर :
शहरात मंगळवारी रात्री घडाळयात 12 चा ठोका पडला आणि फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी सुरु झाली. फटाक्यांच्या आतिषबाजीने रात्रीचा आसमंत उजळून निघाला.यावेळी कोल्हापूरकरांनी एकमेकाला आलिंगन देत 2025 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शहराच्या विविध भागात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तरुणाई नाचगाण्यात दंग झाली. काही ठिकाणी दूधाचे वाटप करण्यात आले.तर अनेकांनी नवीन वर्षाचे संकल्प केले.सामाजिक माध्यमांवरही नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला.
मंगळवारी रात्री 12 वाजता 2024 हे वर्ष संपले आणि 2025 या नवीन वर्षाची सुरुवात झाली.संपूर्ण जगात नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात येते.त्याप्रमाणे कोल्हापूरातही नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.यासाठी गेल्या दोन दिवसापासून हॉटेल्स,परमीट रुम,वाईन शॉप,रिसॉर्टस सज्ज झाली होती.हॉटेल्सवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.काही हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवीन वर्षानिमित्त खास पॅकेज जाहीर केले होते.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच बाजारात गर्दी झाली होती. मटण,चिकनच्या दुकानात दिवसभर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मटणाबरोबर माशांचीही मोठया प्रमाणात विक्री झाली. दारुची दुकाने हाऊसफुल्ल झाली होती. सायंकाळी सातनंतर तरुणाईंकडून आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये रंग चढू लागला. हॉटेल्स,रिसॉर्टस गर्दीने फुलली. हळूहळू मद्याचे प्याले रिचवले जावू लागले त्याप्रमाणे पार्टीमध्ये रंग चढत गेला.रात्री बारा पर्यंत तरुणाई डीजेवर तल्लीन झाली. रात्री बाराचा ठोका पडताच जल्लोषाला सुरुवात झाली.फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.यामुळे सर्व आसमंत आतिषाबाजीत उजळला.करवीरवासियांनी एकमेकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत निरोगी आरोग्याची कामना केल्या.यानंतरही रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरु होता.
उद्यानात गर्दी
नवीन वर्षानिमित्त महापालिकेकडून रात्री 12 पर्यंत उद्याने खुली केली होती.यामुळे अनेकांनी उद्यानात सामूहिक भोजनाचे बेत करुन नवीन वर्षाचे स्वागत केले.नवीन वर्षानिमित्त उद्यानेही फुलली होती.
विविध संघटनांकडून सामाजिक उपक्रम
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांकडून सामाजिक उपक्रम राबवले जातात.काही संघटनांनी दूध वाटप केले.रस्त्यावरील बेघरांना अन्नदान केले.तसेच उबदार कपड्यांचे पांघरुण घातले.
धार्मिक स्थळी दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत
नवीन वर्षाच्या निमित्ताने धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.मंगळवारी सकाळपासूनच धार्मिक स्थळी गर्दी झाली होती.श्री अंबाबाई,श्री जोतिबाच्या मंदिरात नागरिकांची रीघ होती.
शहरात पोलीस बंदोबस्त
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता.दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती.यासाठी पोलीसांकडून ब्रेथ अॅनलायझरवर तपासणी करण्यात येत होती.शहराच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी होती.








