महापालिकेकडून एकूण 9 ठिकाणी श्री विसर्जनाची सोय : विसर्जन तलावांवर गणेशभक्तांनी गर्दी : फिरत्या विसर्जन कुंडांचीही व्यवस्था
बेळगाव : दीड दिवसाच्या गणरायाला गुऊवारी (दि. 28 ऑगस्ट) भावपूर्ण निरोप दिल्यानंतर पाच दिवसांचा गणपती असलेल्या घराण्यांनी रविवारी (दि. 31) विसर्जन केले. विसर्जनाची तयारी दुपारपासूनच सुरू होती. विविध ठिकाणांवरील विसर्जन तलावांवर गणेशभक्तांनी गर्दी केली होती. महापालिकेने शहरात व उपनगरे अशा एकूण 9 ठिकाणी श्री विसर्जनाची सोय केली आहे. त्याचबरोबर 11 फिरत्या कुंडांचीही व्यवस्था आहे. वाहनचालक व निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक महापालिकेने माध्यमांद्वारे प्रसिद्ध केल्याने गणेशभक्तांची उत्तम सोय झाली. तलावाजवळ नसलेल्यांनी फिरत्या कुंडात मूर्ती विसर्जन करणे पसंत केले.
सकाळी घरांतून श्रींची पंचोपचार पूजा झाल्यानंतर, दुपारपासून विसर्जनाच्या तयारीला सुऊवात झाली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने बच्चे कंपनी, मुलांनी फटाके फोडत, गणपतीबाप्पांचा जयघोष करीत आनंद द्विगुणीत केला. काहींनी दुपारी तर काहींनी सायंकाळी विसर्जन केले. अधुनमधून बरसणाऱ्या रिमझिम पावसामुळे व्यत्यय येत होता. तरीही पावसाची पर्वा न करता श्रीमूर्ती घेऊन भाविक विसर्जन स्थळाकडे निघालेले दिसून येत होते. फटाक्यांची आतषबाजी, ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष सुरू हेता. विसर्जन स्थळांवर कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. विसर्जन करताना अनेकजण भावूक झाले होते.
बालचमूच्या श्रीमूर्तीचे विसर्जन
कंग्राळ गल्लीतील बालचमूने स्वत: श्रीमूर्ती तयार करून त्याचे पाच दिवस पूजन केले होते. बालचमूने रविवारी सायंकाळी जुन्या कपिलेश्वर तलावात विसर्जन केले. सायकलवर श्रीमूर्ती ठेवून ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत श्रीमूर्ती विसर्जन स्थळावर नेली. बालचमूची श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. शुभम चौगुले, सोमनाथ सांबरेकर, आकाश थापा, साईराज चौगुले, नकुल हलगेकर, सक्षम मोरे, निखिल यमकनमर्डी, करण परियार व वीरभद्र चौगुले या मुलांनी श्रीमूर्ती बनविली होती. मूर्ती बनविण्यास आठ दिवसांचा कालावधी लागल्याची माहिती बालचमूने दिली.









