रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना गुरुवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. १३ हजार ८३४ घरगुती तर ७सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच शहर तसेच ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमले होते.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, लेझीम तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. महिला, युवक तसेच बाळगोपाळांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये समुद्रकिनारा व इतर प्रमुख विसर्जन ठिकाणांवर पोलीस प्रशासन, नगर परिषद व स्वयंसेवी संस्थांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनंतर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले होते.
सायंकाळनंतर शहरातील मुख्य मिरवणुका रंगतदार वातावरणात पार पडल्या. उशिरापर्यंत ढोल-ताशांचा गजर आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांनी वातावरण भारून गेले. भाविकांच्या डोळ्यात थोडासा विरह असला तरी पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पा घरी येतील, या विश्वासाने गणरायाला निरोप देण्यात आला.








