क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
सहा अविस्मरणीय हंगामानंतर एफसी गोवाने सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर एदू बेडिया याला निरोप दिला आहे. त्याचा करार संपुष्टात आल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. मैदानावरील अतुट बांधिलकी आणि गोवान फुटबॉलचा आयकॉन म्हणून रूपांतरीत झालेले चाहत्यांचे प्रेम तसेच असंख्य रेकॉड्स आणि अविस्मरणीय क्षणांची स्क्रिप्टींग पाहता महत्वपूर्ण योगदानाबद्दल क्लबने बेडियाचे आभार मानले आहे.
इंडियन सुपर लीगचा आयकॉन असलेल्या बेडिया याची आयएसएलमधील इतिहासावर अमिड छाप कायम राहणार आहे. स्पेनचा एदू बेडिया हा 2017 मध्ये एफसी गोवा संघात दाखल झाला. संघाची सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचे योगदान दिल्याने तो अल्पावधीत एक महत्वाचा सदस्य बनला. 2019-20 आयएसएल लीग विनर्स शीड, 2019 सुपर कप आणि 2021 मध्ये ड्युरँड कप जेतेपदांमध्ये त्याचा खेळ निर्णायक ठरला आहे.
एदू बेडियाच्या सहा वर्षांच्या कालखंडामध्ये एफसी गोवाला विजयाची चटक लागली. तसेच सांघिक कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य पाहायला मिळाले. त्याची खेळाप्रति अतुट निष्ठा आणि क्लबप्रती लॉयल्टी कायम लक्षात राहील, असे एफसी गोवाचे संचालक रवी पुष्कर म्हणाले.
अनुभवी खेळाडू आणि कप्तान म्हणून एदू बेडिया याने क्लबला शिखरावर नेले. प्रतिष्ठित एएफसी चॅम्पियन लीगमध्ये एफसी गोवाला भारताचा पहिला क्लब खेळण्याचा मान मिळवून देणे हा त्याचा कुशल नेतृत्वाचा कळस ठरला. मैदानावर किंवा मैदानाबाहेर त्याचे उल्लेखनील नेतृत्व गुण त्याच्या खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये स्पष्ट होते. टेम्पो सेट करण्याची तसेच खेळाच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याची आणि या दोन्हींमध्ये योगदान देण्याची बेडियाची क्षमता उल्लेखनीय आहे. एफसी गोवाची मधली फळी सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी बनवण्यात त्याचा मोठा वाटा राहिला, असे पुष्कर म्हणाले.
एदू बेडियामुळे आमच्या क्लबची वाढलेली लोकप्रियता आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये निर्माण झालेली अनामिक भिती आम्हाला मान्य आहे. त्याच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे पुष्कर म्हणाले. एफसी गोवाचा खरा आयकॉन म्हणून तो आमचे फॅन्स आणि क्लबच्या कायम स्मरणात राहील. तसेच त्याची कारर्कीद आणि कामगिरी भविष्यात क्लबसाठी खेळणाऱ्यांसाठी कायम आदर्शवत राहील. त्यामुळे करार संपुष्टात आला तरी एदू हा एफसी गोवा तसेच क्लबशी जोडलेल्या प्रत्येकांच्या ह्दयात कायम घर करून राहील, असे रवी पुष्कर म्हणाले.
रेसिंग सॅटेंडर, युडी सालामांका, हॅक्यूलीस सीएफ, बार्सिलोना ब, 1860 म्युनिच आणि रेआल झारागोझासारख्या स्पॅनिश क्लबकडून खेळल्यानंतर एदू बेडिया 2017 मध्ये एफसी क्लबला आला. 2017-18 मध्ये आयएसएलमध्ये पदार्पणातील सामन्यात एफसी गोवाने चेन्नईन एफसीवर 3-2 असा विजय मिळविला. तिसऱ्या सामन्यात बेंगलोर एफसीच्या 4-3 अशा एफसी गोवाच्या विजयात एदूचा खेळ निर्णायक होता. 2018-19 चा आयएसएलचा हंगाम एदूसाठी सर्वोत्कृष्ट हंगाम राहिला. या हंगामात 23 सामने खेळताना त्याने 5 गोल केले व 8 गोल करण्यात अन्य खेळाडूंना असिस्ट केले. फॅर्रान कोरोमिनास आणि ह्युगो बूमोस यांच्यासमवेत खेळ करताना एदूचा खेळ नेहमीच बहरलेला दिसला.









