वार्ताहर/बाळेकुंद्री
रिमझिम पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता गणेशभक्तांनी पारंपरिक पध्दतीने व भक्तीमय वातावरणात पूर्व भागातील बाळेपुंद्री खुर्द, मोदगा, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मारीहाळ, सुळेभावी, हुदली गावात सातव्या दिवशीचे घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे फटाक्यांची आतषबाजी, बेन्जो व इतर वाद्यांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरय्या…च्या जयघोषात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. पावसाने सकाळपासूनच उघडीप दिली होती. सांयकाळी पाचनंतर मारिहाळ येथील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर याचवेळी पावसाच्या हलक्या व कांही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्यास प्रांरभ झाल्याने मोठ्या मुर्तीना प्लास्टिकचे आवरण झाकून नेण्यात आले. मात्र या पावसाची तमा न बाळगता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी गावच्या खालच्या विहिरीत मूर्तीची विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. मारिहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय मंजुनाथ नायक व चन्द्रशेखर यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.









