विसर्जन तलावांवर गणेशभक्तांची रिघ
बेळगाव : गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, अशी हाक देत बुधवारी पाचव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला. सायंकाळी 6 नंतर बेळगावच्या विसर्जन तलावांवर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी व डीजेच्या तालावर मिरवणुका काढण्यात आल्या. बुधवारी पारंपरिक पद्धतीने पाचव्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरातील कपिलेश्वर विसर्जन तलावासोबतच जक्कीनहोंड, अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, किल्ला तलाव येथे विसर्जनासाठी गर्दी झाली होती. दीड दिवसानंतर पाचव्या दिवशी विसर्जन करणाऱ्यांची संख्या अधिक असते. विसर्जन तलावांवर निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. कपिलेश्वर उड्डाण पुलापासून विसर्जन तलावापर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
सरकारी कार्यालयातील गणेशमूर्तींचे विसर्जन
बेळगाव शहरातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. तहसीलदार कार्यालय, पोस्ट कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, रेल्वे, विभागाकडून गणेश मूर्तींची पाच दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर बुधवारी विसर्जन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयातील गणेश मूर्तीचे किल्ला तलाव तर उर्वरित कार्यालयांच्या गणेश मूर्तींचे कपिलेश्वर तलावात विसर्जन करण्यात आले. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनीही विसर्जन मिरवणूकमध्ये सहभाग घेतला होता.









