डॉल्बीसह पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई; सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन : मिरवणुकांमुळे सर्वत्रच उत्साहाचे वातावरण : महाप्रसादाच्या आयोजनाला अधिकतर मंडळांचे प्राधान्य, सजावट, सजीव देखावे ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
वार्ताहर/निपाणी
आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये पारंपरिक विधीने गेल्या 11 दिवसांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दरम्यानच्या या 11 दिवसात प्रत्येक सार्वजनिक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि संस्कृतीचा जागर करत गणेशोत्सव साजरा केला. या सोहळ्यामध्ये दररोज वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले. स्पर्धात्मक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले. त्याचबरोबर काही मंडळांनी सजीव देखावे सादर करून भाविकांना या उत्सव सोहळ्यात एक पर्वणी उपलब्ध करून दिली. अकरा दिवसानंतर मात्र आराध्य दैवत आणि सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणरायाला निरोप द्यावा लागला. आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा गजर, मूर्तींची आकर्षक सजावट करत मोठ्या उत्साहाने विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या. यामध्ये युवक-युवती, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले.
यंदा डॉल्बी सक्तीने बंद राहील असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. स्वागत मिरवणुका काढत असताना अनेक ठिकाणी डॉल्बीच्या वापरावर पोलीस प्रशासनाने मज्जाव देखील केला. यामुळे यंदा डॉल्बी वाजणार नाही असेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. यामुळे बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीवर होणारा खर्च टाळत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. यामुळे पारंपरिक वाद्यांना एक प्रकारे अच्छे दिन आल्याचे दिसून आले. पण विसर्जन मिरवणुकांमध्ये मात्र प्रशासनाने काहीशी शिथिलता आणत वेळेचे बंधन घालून डॉल्बीचा वापर करण्याला एक प्रकारे परवानगी दिली असे दिसून आले. यामुळे काही मंडळांच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा दणदणाट झाल्याचे दिसून आले. पण बहुसंख्य मंडळांनी मात्र प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आकर्षक लाईट शो व एलईडी या माध्यमातून विसर्जन मिरवणुका काढल्या.
शनिवारी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा अधिक वापर झाला. आकर्षक विद्युत रोषणाई देखील सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. काही मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात मिरवणुका काढल्या. पण आवाजावर मात्र मर्यादा ठेवली गेली. यामुळे सर्वत्र एक उत्साह दिसून येत होता. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. शहरापाठोपाठ ग्रामीण भागात देखील वेगवेगळे उपक्रम हाती घेत विसर्जन मिरवणुका काढल्या गेल्या. बाप्पांना निरोप देताना साजरा होणारा हा विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
कोगनोळी परिसरात बाप्पांना भावपूर्ण निरोप
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील कुर्ली, आप्पाचीवाडी, भाटनांगनूर, हदनाळ, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ के. एस, आडी, बेनाडी, जैनवाडी, बोळेवाडी, हणबरवाडी, दत्तवाडी, कुंभळकट्टी आदी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. बुधवारी गणरायाचे आगमन झाल्यानंतर वातावरण मंगलमय बनले होते. मोठ्या भक्तिभावाने गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले अकरा दिवस विघ्नहर्त्या श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात आली. सायंकाळी 5 वाजल्यापासून सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी जात होते. काही मंडळांनी ढोल, ताशा, बॅन्जो यासह अन्य वाद्यांच्या गजरात सार्वजनिक तलाव, ओढा, नदी आदी ठिकाणी धार्मिक विधी व आरती करून गणरायांचे विसर्जन केले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या’! असा जयघोष करण्यात आला.
यमकनमर्डीत गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
यमकनमर्डी : यमकनमर्डीसह परिसरातील दड्डी, उळ्ळागड्डी-खानापूर, कुरणी, पाश्चापूर, शहाबंदर, हत्तरगी, इंदिरानगर, इस्लामपूर, मोदगा, नांगनूर आदी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक काढली. बुधवार 27 ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन झाल्यानंतर वातावरण मंगलमय झाले होते. मोठ्या भक्तिभावाने गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापना करून विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात आली. शनिवारी दुपारी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या मिरवणुकीत तरुणांनी फटाक्याची आतषबाजी करत, पारंपरिक वाद्यांच्या संगीत साथीत व पारंपरिक विधीप्रमाणे गणपतीचे विसर्जन केले.









