‘गणपती बाप्पा मोरया’चा अखंड जयघोष : ढोलताशांच्या बरोबरच डीजेवर थिरकली तरुणाई
बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया’चा अखंड जयघोष, ढोलताशांच्या बरोबरच डीजेवर थिरकणारी तरुणाई, भाविकांची लक्षणीय गर्दी यामुळे फुलून गेलेले रस्ते अशा वातावरणात श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. शनिवारी सायंकाळी सुरु झालेली ही मिरवणूक तब्बल 24 तासांहून अधिक वेळ सुरु होती. मुंबई-पुण्यापाठोपाठ बेळगावची श्री विसर्जन मिरवणूकही वैशिष्ट्यापूर्ण ठरते. यंदाही त्याचे प्रत्यंत्तर आले. हुतात्मा चौक येथून विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी 6 वाजता सुरुवात झाली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त शुभा बी., आमदार असिफ सेठ, माजी आमदार अनिल बेनके, महापौर मंगेश देसाई, उपमहापौर वाणी जोशी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, गणेशपूर येथील रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज, महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण-पाटील,अॅड. हणमंत कोंगाली, विजय जाधव आदी उपस्थित होते. श्रीगणेशाची आरती केल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.
घरगुती गणेश विसर्जन
शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी गर्दी केली. कपिलेश्वर तलाव, जक्कीन होंड तलाव, शहापूर तलाव, वडगाव तलाव, अनगोळ तलाव, नाथ पै तलाव, जुने बेळगाव येथील विसर्जन तलावात घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांनी कार, रिक्षा, टेम्पो, बैलगाडी, सायकल, ट्रॅक्टर, दुचाकी आदी इतर खासगी वाहनांतून श्रीमूर्ती विसर्जनासाठी आणल्या. या मार्गावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. तर काही ठिकाणी साऊंड सिस्टम लावून वाजत-गाजत मूर्ती आणण्यात येत होत्या. भाविकांनी गुलालाचीही उधळण केली.
हुतात्मा चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर काही मोजकीच गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. मारुती गल्लीमध्ये एकही गणेश मूर्ती दाखल न झाल्याने सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक मार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सुरुवातीला सहभागी झालेल्या मंडळांचे कावेरी कोल्ंिड्रक्ससमोर उभारण्यात आलेल्या लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगावच्यावतीने श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. माळी गल्लीच्या मानाच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करून या मंडळाने सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जन करण्याचा मान मिळविला. त्यानंतर संथगतीने अन्य मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन सुरू झाले.
रात्री 10 च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन प्रथम केले. आणि नंतर सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मंडपात दाखल झाले. त्यामुळे खऱ्याअर्थाने रात्री 10 च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलताशा पथकांचे सादरीकरण पाहण्यासाठी लोकांनी आवर्जुन गर्दी केली होती. त्यामुळे या पथकांना प्रोत्साहन मिळाले. याशिवाय करेला, लाठीकाठी, लेझिमचे प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले. काही नागरिकांनीही सहभागी होऊन या प्रत्याक्षिकांचे सादरीकरण केले.
रात्री 11 नंतर मिरवणुकीत नागरिकांनी गर्दी
घरगुती गणपतीचे विसर्जन केल्यानंतर नागरिक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत होते. रात्री 11 नंतर मिरवणुकीत नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या साथीने यंदाची मिरवणूक वैशिष्टपूर्ण ठरली. ढोलताशा पथकांच्या वादकांनी आपल्या वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक पाहण्यासाठी प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये गर्दी झाली होती. तसेच रस्तेही गर्दीने फुलले होते.
शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स
दरम्यान, वाहनांची गर्दी रोखण्यासाठी आणि नागरिकांना सहजपणे श्रीमूर्तींचे विसर्जन मिरवणूक पाहता यावी, यासाठी पोलीस प्रशासनाने मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या आडव्या रस्त्यांची बॅरिकेड्स लावून अडवणूक केली होती. याची कल्पना नसल्याने वाहनधारकांना मात्र लांबचा फेरा मारावा लागत होता. यामुळे नागरिकांना समस्या निर्माण झाल्या होत्या. पोलिसांकडून शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
पावसाची उघडीप दिल्याने उत्साहाला उधाण
अधूनमधून होत असलेल्या पावसाने श्री विसर्जन मिरवणुकीदरम्यान उघडीप दिल्याने उत्साहाला उधाण आले होते. पावसाचा व्यत्यय न आल्याने मिरवणूक योग्यरित्या पार पडल्या. पावसाच्या उघडीपमुळे नागरिकही मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. लहान मुलांसह वृद्धांपर्यंत सर्वजण मिरवणुकीत सहभागी झाले होते. पाऊन नसल्याने उत्साहात आणखी भर पडली होती.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून प्रसादाचे वाटप
बेळगावची श्री विसर्जन मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी विविध राज्य व भागातून नागरिक सहभागी होत असतात. यामुळे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध ठिकाणी प्रसाद बनवून ते पाकिटबंद करून वाहनांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.
108 श्रीफळ वाढविले
सालाबादप्रमाणे वर्षीसुद्धा एम. जी. सुब्रम्हण्यम कुटुंबीयांनी 108 श्रीफळ वाढविले. विसर्जन मिरवणुकीतील पहिला मानाचा संयुक्त महाराष्ट्र चौकातील श्रीमूर्तीसमोर श्रीफळ फोडून ही परंपरा अखंड राखण्यात आली.
मिरवणुकीला विलंब
शनिवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चौकातील श्रीमूर्ती विसर्जनासाठी दाखल झाली. त्यानंतर साधारण दोन ते तीन तास कोणत्याच मंडळाने श्रीमूर्ती दाखल न केल्याने रस्ते पूर्णत: मोकळे होते व रस्त्यावर शुकशुकाट होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रथम घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन केले व त्यानंतर मंडळाच्या श्रीमूर्ती विसर्जनासाठी ते दाखल झाले. परिणामी मिरवणुकीला विलंब होत गेला.
धर्मवीर संभाजी परिसरात ठिकठिकाणी स्टेज
श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसारमाध्यमांनी धर्मवीर संभाजी परिसरात ठिकठिकाणी स्टेज उभे केले होते. मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तेथे स्वागत करण्यात आले. त्या ठिकाणी गर्दीचा ओघ अखंड सुरू होता.
ग्रहणामुळे श्रीमूर्ती विसर्जन दोन तासांसाठी थांबविले
दरम्यान, ग्रहण लागले म्हणून साडेदहापासून श्रीमूर्ती विसर्जन दोन तासांसाठी थांबविण्यात आले. 11.30 वाजून गेले तरी अद्याप चौदा श्रीमूर्तींचे विसर्जन करावयाचे शिल्लक होते. एकूणच यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला दरवर्षीपेक्षा अधिकच विलंब झाला.
अधिकाऱ्यांचे प्रयत्न आपण समजूनच घेत नाही
बेळगावच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी दरवर्षी शासकीय अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना यश येतेच असे नाही. डीजेला फाटा देऊन पारंपरिक वाद्ये, ढोलताशा, लेझिम, झांजपथक यांच्या सहभागाने मिरवणूक वैशिष्ठ्यापूर्ण ठरावी असा प्रयत्न प्रशासनातर्फे होता. अलिकडेच बेळगावमध्ये पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या भूषण गुलाबराव बोरसे यांनी डीजेवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने गेल्या दीड महिन्यापासून प्रयत्न सुरू केले होते.याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सार्वजजिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या.
याच विषयावर बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशात डीजे दणदणाटामुळे कितीजणांना हृदयविकाराचा झटका आला, कितीजणांमध्ये बहिरेपणा निर्माण झाला, याचा तपशीलच दिला होता. इतकेच नव्हे तर हॉस्पिटलच्या मार्गावरून मिरवणूक जात असताना डीजे लावण्यावर कायद्याने बंदी आहे, असे स्पष्ट करून शहरातील मिरवणूक मार्गावरील हॉस्पिटलची यादीही सादर केली होती. इतकेच नव्हे तर विसर्जन मिरवणूक दरम्यान महाराष्ट्रातील डीजे मागविल्या जातात. हे लक्षात घेऊन कोल्हापूर व सांगलीच्या पोलीस प्रमुखांशी संपर्क साधून डीजे आणण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्तांच्या जनजागृती मोहिमेमुळे व बैठकांमुळे यंदाची मिरवणूक डीजेमुक्त असेल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवत दणक्याने डीजेचा दणदणाट सुरू ठेवला.
दरम्यान कोणत्याही मिरवणुकांमध्ये बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना डीजेचा दणदणाटाचा त्रास होतो हे वास्तव समोर आल्याने पोलीस आयुक्तांनी दोन हजार इअर प्लक्स मागविले होते. विसर्जन मिरवणुकीमध्ये बहुसंख्य पोलिसांनी हे प्लक्स घालून आपले कान सुरक्षित राहतील याची काळजी घेतली होती. अर्थात डीजेचा दणदणाटाचा त्यांना त्रास व्हायचा तो झालाच. एकूणच आपले आरोग्य पणाला लावून डीजे सुरूच ठेवण्याच्या तरुणाईच्या अट्टहासाने डीजेमुक्त मिरवणूक या पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांकडे साफ दुर्लक्ष केले. डीजेचा दणदणाट कानासाठी धोकादायक आहे. तर डीजेच्या वापरावेळी निघणारे लेझर किरण डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. पोलीस आयुक्तांचे प्रयत्न वाखाणण्याजोगेच होते. अधिकारी विसर्जन मिरवणुकीला शिस्त लागावी यासाठी धडपड करतात. ते येतात आणि आपला कार्यकाळ संपला की पुन्हा दुसरीकडे रूजू होतात. मात्र बेळगावची श्री विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यापूर्ण ठरावी व प्रत्येकाचे आरोग्य सुरक्षित रहावे या हेतूने केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे प्रयत्न आपण समजूनच घेत नाही. यापरते दुर्दैव ते काय?









