‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष : तरुणांसह आबालवृद्धांचा उत्साह : रात्री उशिरापर्यंत मिरवणुका
वार्ताहर /किणये
तालुक्यात गुरुवारी गणेशमूर्तींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले. घरगुती व सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन भक्तांनी अगदी जड अंत:करणाने केले. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, असा जयघोष करत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही, तालुक्यातील पीक पाणी सुकून जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून पाऊस पडावा, असे साकडे भक्तांनी गणेशाकडे घातले आहे. तालुक्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान पावसाची रिमझिम झाली. तरीही भक्तांचा उत्साह कायम होता. बहुतांशी गावामध्ये यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देण्यात आला. पारंपरिक वाद्यांसह टाळ, मृदंग व ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुका गावामध्ये मोठ्या जल्लोषात काढण्यात आल्या. दीड महिन्यापासून तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी नदी, नाले व तलावांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागील आठ दहा दिवसापासून आपल्या गावाजवळ असलेल्या नदी नाल्यांच्या बंधाऱ्यांवर फळ्या घालून पाणी अडविले होते. त्यामुळे गणेशभक्तांना गणेश विसर्जन करण्यासाठी दिलासा मिळाला.
किणये येथील घरगुती व सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन गावाजवळील धरणात करण्यात आले. तर काही भक्तांनी मुंगेत्री नदीमध्ये विसर्जन केले. यावेळी ‘गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष व फटाक्यांची आतषबाजी भक्त करीत होते. रात्री उशिरापर्यंत किणयेतील गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. शिवनगर व रणकुंडये, बहाद्दरवाडी, संतिबस्तवाड भागातील भक्तांनी मुंगेत्री नदीमध्ये गणपतींचे विसर्जन केले. वाघवडेनजिकच्या पुलाजवळ विसर्जनासाठी भक्तांची मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून आली. कर्ले, जानेवाडी येथील भक्तांनी सकाळपासून गणेशमूर्तींचे विसर्जनाला सुरुवात केली. बेळगुंदी, सोनोली, यळेबैल येथील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन मार्कंडेय नदीमध्ये केले. पिरनवाडी येथील गणेशमूर्तींचे विसर्जन गावाजवळील व खादरवाडी येथील तलावात केले तर सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जन जक्कीनहोंडा येथे गुरुवारी रात्री भक्तीमय वातावरणात करण्यात आले. खादरवाडीतील गणेशमूर्तीचे विसर्जन तलावाच्या ठिकाणी करण्यात आले. बस्तवाड, हलगा येथील घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाला गुरुवारी सकाळी 10 पासून सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन हलगा येथील तलावात केले. या मिरवणुकीत लेझीम व ढोल ताशांचा गजर झाला.
सोमनाथनगर शिवराज कॉलनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली. मिरवणुकीत तरुणासह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. बॉक्साईट रोड येथील तलावात श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सावगाव व मंडोळी येथील तलावात गणेशमूर्ती विसर्जन गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बेनकनहळ्ळी, हंगारगा, बामनवाडी आदी परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले.
कडोलीत गणरायाला निरोप
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात कडोलीत सार्वजनिक आणि घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.हंदिगनूर क्रॉसजवळील खडी मशिन क्वॉरी, मार्कंडेय नदीवर गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दिवसभर गणेशमूर्तींना निरोप देण्याचा कार्यक्रम सुरू होता. रात्री 8 पासून गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकीला प्रारंभ झाले. सर्वच गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीचा वापर टाळल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.
मच्छेत गणेश विसर्जन
येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या व घरगुती गणेश विसर्जन मिरवणुकीस पारंपरिक वाद्य-वृंदाच्या गजरात गुरुवारी सायंकाळपासून सुरुवात झाली. सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी ढोल-ताशे यासह विविध वाद्य-वृंदाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. काही मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्रीची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत शांततेत पार पडली.









