प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव काळात नऊ दिवस भक्तीभावाने पुजलेल्या गणरायाला शुक्रवारी शहरासह उपनगरात भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. अनगोळ येथील भक्त पुंडलिक कुंडावर बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. सकाळपासून घरगुती गणेश विसर्जन सुरू होते. तर रात्री 10 नंतर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुढे सरसावल्या.
अधूनमधून तुरळक पाऊस सुरू होता. ‘गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वषी लवकर या’ असे आवाहन करीत बाप्पांना निरोप देण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. त्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय विसर्जनही मोठय़ा उत्साहात झाले. फटाक्मयांची आतषबाजी, बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना जीवाला या जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला.
भक्त पुंडलिक कुंडावर सकाळपासून विसर्जनासाठी घरगुती गणेशमूर्ती घेऊन भाविक दाखल होत होते. त्यामुळे दिवसभर विसर्जनासाठी वर्दळ पहायला मिळाली. रात्री 10 वाजेपर्यंत घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यानंतर सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे गणेशभक्तांचा गजर आणि फटाक्मयांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कुंडावर विद्युत रोषणाई, पाणी तसेच पेनची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जक्कीनहोंडा तलाव
जक्कीनहोंडा तलावातही सकाळपासून घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी वर्दळ पहायला मिळाली. रात्री सार्वजनिक गणेशमूर्तींचेदेखील विसर्जन झाले. याठिकाणी गणेशभक्तांनी बाप्पांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. दोन वर्षांनंतर गणेश विसर्जन वाजतगाजत आणि फटाक्मयांच्या आतषबाजीमध्ये झाल्याचे दिसून आले. शिवाय विसर्जनामुळे रस्ते आणि विसर्जनस्थळे गर्दीने फुलून गेली होती.









