बेळगावकरांसाठी सरते वर्ष ठरले अनेक घडामोडींचे
जानेवारी : एपीएमसी-किसान मार्केट यांच्यातील वाद उफाळला

याच महिन्यात एपीएमसी आणि किसान मार्केट यांच्यातील वाद उफाळून आला. सातत्याने त्याबद्दल वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप होत राहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 ते 18 जानेवारी पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद राहिल्या. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याच महिन्यात आरसीयूने कन्नडसक्ती मागे घेतली. मनपाने महापौर व उपमहापौर पदासाठी आरक्षण जाहीर केले. जानेवारी महिन्यात हिंडलगा कारागृहात एका चिमुकलीचे बारसे साजरे झाले. विशेष म्हणजे ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांना बाळाचे नाव ठेवण्याचा मान मिळाला. याच महिन्यात भुतरामहट्टी येथे अस्वल दाखल झाले. तरुण भारतचा कॉलेज कट्टा हा विशेष कार्यक्रम याच महिन्यापासून सुरू झाला आणि तरुणाईचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.
फेब्रुवारी : निर्बंध उठले अन् मंदिरे फुलली

कोरोनाचे निर्बंध उठले आणि मंदिरे खुली झाली. भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. परिणामी परिवहनला नफा झाला. याच महिन्यात चित्रपटगृहेही सुरू झाली आणि मनोरंजन क्षेत्राला चांगले दिवस आले. लोकमान्य सोसायटीतर्फे मराठा शौर्यदिन साजरा करण्यात आला. कर्नाटक-महाराष्ट्र बससेवासुद्धा याच महिन्यात पूर्ववत सुरू झाल्या. हिजाबवरून बेळगावमध्येही वातावरण तापले. महाराष्ट्राच्या लालपरीची याच महिन्यात कर्नाटकात एन्ट्री झाली. अलारवाड सांडपाणी प्रकरणी याचिकाकर्त्यांना नोटिसा आल्या. आरटीओने या महिन्यात 98.36 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. बेळगुंदीमध्ये वासरांचे भव्य प्रदर्शन भरले. जिल्ह्याला 35 विद्युत स्टेशन याच महिन्यात मंजूर झाली. गराज कॅफेच्या खाद्य महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. हिंडलगा पंपिंग हाऊसमध्ये बिघाड होऊन पाणी टंचाई सुरू झाली. गुलमोहर बागचे चित्रप्रदर्शन याच महिन्यात झाले. वसंत व्याख्यानमाला व आरसीयूमध्ये गोमंतक साहित्यावर चर्चासत्र पार पडले. लोकमान्यतर्फे मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमातून मराठी भाषेचा गौरव, याच महिन्यात युक्रेन युद्धामुळे तेथे अडकलेल्या मुलांबद्दल पालक चिंताक्रांत झाले. मात्र मुले सुखरूप परतली.
मार्च : अवयवदानामुळे बेंगळूरला पोहोचले लिव्हर

मार्च महिन्यात सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कार्यक्रम झाले. मुख्य म्हणजे के. बी. कुलकर्णी स्मृतिदिनानिमित्त प्रदर्शन आणि व्याख्यान, मराठी भाषा दिनानिमित्तही व्याख्यान झाले. आरसीयूचा पदवीदान समारंभ, पै-पैशाची गोष्ट हे कार्यक्रमही याच महिन्यात झाले. लक्षणीय घटना म्हणजे उमेश दळवी यांच्या अवयवदानामुळे बेंगळूरला लिव्हर पोहोचले.
एप्रिल : शहरात प्रथमच पिंक ऑटो धावली एप्रिलमध्ये पहिली

अॅम्ब्युलिफ्ट बेळगावमध्ये दाखल झाली तर प्रथमच इनरव्हील व आरटीओच्या सहकार्याने पिंक ऑटो धावली. गराज कॅफे येथे कार्टुनिस्ट रॉरेन्स जोसेफ यांची कार्यशाळा झाली आणि पुन्हा याच महिन्यात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. वसंत व्याख्यानमाला, इस्कॉनची रथयात्रा हे या महिन्यातील आणखी काही विशेष कार्यक्रम.
मे : हलगा-मच्छे बायपाससाठी पुन्हा हुकूमशाही

मे महिन्यात हलगा-मच्छे बायपाससाठी पुन्हा हुकूमशाही सुरू झाली. सांस्कृतिक क्षेत्रात बसवेश्वर आणि शिवजयंती हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय सण झाले. 4 मे रोजी शिवजयंतीची भव्य अशी मिरवणूक निघाली. याच महिन्यात मुस्लीम बांधवांनी ईद साजरी केली. कारागृहातही ईद साजरी झाली. लोकमान्य सांस्कृतिक केंद्रातर्फे नवा शुक्रतारा आणि सरस्वती वाचनालयातर्फे महेश काळे यांची मैफल यांनी रसिकांना आनंद दिला. डॉ. राजेश लाटकर लिखित डॉक्टर तुमचं चुकलंच पुस्तक प्रकाशनही याच महिन्यात, मराठा मंदिरच्या पुढाकाराने साहित्य संमेलनही झाले आणि आंबा महोत्सवालाही प्रतिसाद लाभला.
जून : शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

कोट्यावधी रु. खर्चून उभारलेल्या सुवर्णविधानसौधजवळ शेवया वाळत घालण्याच्या प्रकरणाची चर्चा या महिन्याच्या प्रारंभीच रंगली. शेवटी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट द्यावी लागली. शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शिक्षक मतदारसंघांसाठीची निवडणूक याच महिन्यात झाली. एणगी गावातील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन छेडले. एसकेई सोसायटीतर्फे गोवामुक्ती क्रांतिदिन साजरा करण्यात आला. शहर परिसरात योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी कागदपत्रांसाठी मराठी भाषिकांनी मोठा एल्गार केला.
जुलै : संततधार पावसाने शहरवासीय हैराण
जुलै महिन्यात रोप बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व बसपाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. जनावरांसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल झाले. तर कोंबड्यांच्या खाद्यदरात वाढ झाल्याने पोल्ट्री चालकांना फटका बसला.
ऑनलाईन पासपोर्ट प्रक्रिया सुरू झाली. मात्र पावसाने अनमोड-गोवा घाटात दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली. मनपाकडून कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेला प्रारंभ झाला. आषाढीनिमित्त सुरू झालेल्या खास रेल्वेला प्रतिसाद मिळाला. संततधार पावसाने शहरवासीय हैराण झाले. दुसरीकडे
कॅन्टोन्मेंटमध्ये 12 दिवस पाणी प्रश्न गंभीर झाला व ही समस्या गाजली. मनपाने प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू करून धाडसत्र आरंभले. याच महिन्यात पावसामुळे हेस्कॉमला 1 कोटी 78 लाखांचा फटका बसला.
ऑगस्ट : बिबट्याचा धुमाकूळ

ऑगस्ट महिना बिबट्याने गाजविला आणि वनखाते, पोलीस प्रशासनाला सळोकीपळो करून सोडले. तोतया पत्रकारांचा सुळसुळाटही वाढला. या महिन्यातही पाऊस सुरूच राहिला. सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण-प्रशिक्षणाची घोषणा करण्यात आली. मराठी कागदपत्रांसाठी म. ए. समितीने ठिय्या आंदोलन छेडले तर जाधवनगर येथे बिबट्याने गवंड्यावर हल्ला केला. हा संपूर्ण महिना बिबट्याने आणि पावसाने गाजविला. बिबट्याच्या धास्तीमुळे काही शाळांना सुटीही मिळाली. त्याच्या शोधासाठी हत्ती पथकही आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यथावकाश सर्वांना पुरेपूर दमवून बिबट्या आपल्या आदिवासात परतला.
सप्टेंबर : दुर्गामाता दौडलाही उत्तम प्रतिसाद

सप्टेंबर महिना गणेशोत्सवाने गाजला. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्याने यंदा भक्तांनी अमाप उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. 6 सप्टेंबरला मनपा निवडणुकीला वर्ष उलटले. पण सभागृह अस्तित्वात आले नाही. याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी निवडणूक वर्षपूरतीचे आचरण केले. याचवेळी
टोमॅटोही कमालीचा महागला. अग्निवीरसाठी तरुणाई मोठ्या संख्येने दाखल झाली. नवरात्रोत्सवामध्ये अनेक ठिकाणी गरबा-दांडीयाचे आयोजन करण्यात आले. दुर्गामाता दौडलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
ऑक्टोबर : ग्रहणाचाही परिणाम जाणवला

ऑक्टोबर महिन्यात ऊस दरप्रश्नी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेली धडक हा चर्चेचा विषय ठरला. तर इंग्रजी वृत्तपत्रात भूसंपादनासाठीचे नोटिफिकेशन आल्याने शेतकरी खडबडून जागे झाले आणि म. ए. समितीने हरकती दाखल करून घेण्यास प्रारंभ केला. 15 ऑक्टोबर रोजी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील नेते बेळगावात आले. लष्कराचा युद्योतर पुनर्मिलन सोहळा गाजला. तरुण भारतने ‘मी नवदुर्गा’ हा उपक्रम सुरू केला. ज्याला महिलांनी लक्षणीय प्रतिसाद दिला. आर्ट्स सर्कलतर्फे दिवाळी पहाटला आनंद भाटे यांचे गायन झाले. मात्र दिवाळीच्या दोन दिवसांत ग्रहणाचाही परिणाम जाणवला. केएलईमध्ये प्रथमच ह्दयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
नोव्हेंबर : रिंगरोडविरोधात म. ए. समितीतर्फे चाबुक मोर्चा आंदोलन

1 नोव्हेंबर रोजी हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्यात आला. नोव्हेंबरमध्ये रिंगरोड विरोधात म. ए. समितीने चाबुक मोर्चा आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळला, हे विशेष होय. लम्पी स्कीनमुळे एकूण 2400 गोवर्गीय जनावरे मृत झाल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली. याच महिन्यात उत्सुकता ताणलेली सीमाप्रश्नाची सुनावणी लांबणीवर पडली. कर्नाटक-महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेली बैठक गाजली. तर दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची कोल्हापूर येथे बैठक गाजली. याच महिन्यात अनंत मनोहर यांच्यावर एक मेन्श माणूस हा कार्यक्रम झाला. हलगा, मच्छे बायपास काम बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. बेळगावलाच ग्राहक आयुक्त न्यायालय हवे, यासाठी वकिलांनी या महिन्यात आंदोलन छेडले.
अभिनंदनीय निवड

तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक, एसकेई सोसायटीचे अध्यक्ष म्हणून किरण ठाकुर यांची निवड झाली. तसेच इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या कार्यकारिणीपदीसुद्धा किरण ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली.
डिसेंबर : सीमाप्रश्न देशपातळीवर गाजला

डिसेंबरमध्ये सीमाप्रश्न देशपातळीवर गाजला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, राज्यपालांची बैठक गाजली. महाराष्ट्रातील नेते सीमाप्रश्नी बेळगावला येणार म्हणताच विरोधकांनी हिरेबागेवाडी टोलनाक्यावर गोंधळ घातला. रोटरी अन्नोत्सवाला प्रतिसाद मिळाला. मार्गशीर्ष गुरुवार, ख्रिसमस यामुळे बाजारपेठही गजबजली. निवृत्त लेफ्टनंट जनरल पन्नु यांनी एसकेईला भेट दिली. ट्रॅव्हल कार्ड वितरणाला याच महिन्यात सुरुवात झाली. सरकारच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महामेळाव्याला प्रशासनाने दडपशाहीने रोखले. मात्र सीमावासियांनी कोल्हापूरमध्ये जाऊन याबाबत निषेध नोंदविला. मराठा लाईट इन्फंट्री व सांबरा एअरफोर्स स्टेशन येथे अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन या बेळगाव दौऱ्यावर आल्या.
मोती हरपले
यावर्षी उद्योगपती अरविंद गोगटे, डॉ. इंदुमती जोशी, परशराम बेडका, एन. डी. पाटील, अॅड. राम आपटे, हेमंत देशपांडे, यार्बलच्या सुमंगला पाटील, अॅड. किसन येळ्ळूरकर, मंत्री उमेश कत्ती, आनंद मामनी यांच्यासह अनेक मोती गळाले.
महापालिकेवर प्रशासकीय राजवटच कायम !

कोरोनाच्या महामारीनंतर महापालिकेचा कारभार सुधारेल आणि महापौर-उपमहापौर निवड होईल, अशी अपेक्षा 2022 च्या सुरुवातीस वाटली. मात्र वर्ष संपत आले तरी महापौर-उपमहापौर निवडीचे क्लिष्ट संपले नाही. महापालिका निवडणूक होऊनदेखील 2022 या वर्षात मनपावर प्रशासकीय राजवटच आहे. वर्षभरात अशा विशेष काही घटना घडल्या नाहीत. मात्र महापौर-उपमहापौर निवड आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. पण काही मोजक्याच समस्यांचे निवारण झाले आहे.
पाणीपुरवठा मंडळाच्या कामगारांचे वेतन कपात करण्यात आल्याने, तसेच काही कामगारांना कमी करण्यात आल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता. कामगारांनी आंदोलन करून कामावर घेण्याची मागणी केली होती. तसेच वॉर्डस्तरीय कमिटी स्थापन करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने महापालिका आयुक्तांना अनेकवेळा निवेदने दिली. पण आयुक्तांनी वर्षभरात या मागणीची पूर्तता केली नाही.
मार्च महिन्यात वसुलीसाठी टार्गेट देण्यात आले. पण जागृत मालमत्ताधारकांनीच घरपट्टी भरणा करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम हलके केले. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे याचा फायदा 30 हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी घेतला. एका महिन्यात 17 कोटींचा महसूल महापालिकेच्या खजिन्यात जमा झाला होता. महापालिकेच्या व्यापारी संकुल गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपल्याने नव्या भाडेकरारासाठी मे महिन्यात लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र लिलाव प्रक्रियेला गाळेधारकांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 350 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी वर्षभरात 5 वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. महापौर-उपमहापौर निवड करावी, अशा मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
पावसाळ्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. विशेषत: मराठा कॉलनी, वीरभद्रनगर, वडगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आठ दिवस बंद होता. ऐन पावसाळ्यात शहरवासियांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
महापालिका निवडणूक होऊन वर्ष झाले. तरी महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येवून प्रशासनाच्या निषेधार्थ महापालिका कार्यालयासमोर केक कापला. यादरम्यान महापालिका कार्यालयात बसण्यास विरोध करून नगरसेवकांना बाहेर हकलण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला. त्यामुळे महापालिका कार्यालयात गोंधळ झाला होता. आपल्या हक्कासाठी वर्षानुवर्षे एकत्र लढा देणाऱ्या महापालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने 2022 या वर्षात संघटनेत दुफळी निर्माण झाली.
विस्थापितांना कायमस्वरुपी गाळे द्या, अशा मागणीमुळे स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेतलेल्या कलामंदिरच्या व्यापारी संकुलाचे काम रखडले होते. कामाच्या पूर्ततेसाठी उर्वरित गाळे हटविण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने केल्यामुळे 25 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याचा अंत झाला. मात्र गाळेधारकांनी माघार न घेता पुन्हा नव्या जोमाने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. 2022 हे वर्ष प्रशासकीय राजवटीचे राहिले असून स्मार्ट सिटी म्हणून पारितोषिक पटकाविलेल्या बेळगाव शहरात पाणी समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि पथदीपांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आगामी येणाऱ्या 2023 वर्षात नागरिकांच्या समस्यांचे निवारण व्हावे, तसेच लवकरच महापौर-उपमहापौर निवड करून संविधानाने दिलेले हक्क सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींना मिळावेत, ही अपेक्षा आहे.
नागरी समस्यांचे निवारण करण्यात कॅन्टोन्मेंट प्रशासन अपयशी

कॅन्टोन्मेंट परिसर शहराचा अविभाज्य भाग आहे. कॅन्टोन्मेंटमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे शहरवासियांचे लक्ष असते. केंद्र आणि राज्य शासनाने निधी दिला नसल्याने कॅन्टोन्मेंटची विकासकामे ठप्प झाली आहेत. कॅन्टोन्मेंट लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून 2 वर्षे झाली. पण निवडणूक झाली नाही.
कॅन्टोन्मेंटवासियांचे लक्ष निवडणुकीकडे लागून होते. पण 2022 संपले तरी कॅन्टोन्मेंटची निवडणूक झाली नाही. नागरी समस्यांचे निवारण करण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासन अपयशी ठरले आहे. पथदीपांच्या विद्युतबिलाची रक्कम कॅन्टोन्मेंटने अदा केली नसल्याने दीड महिना कॅन्टोन्मेंटच्या पथदीपांचा विद्युतपुरवठा हेस्कॉमने बंद केला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला होता. तसेच पाणीबिलाची रक्कम अदा केली नव्हती. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली होती. यंदा मुबलक पाणीसाठा असूनही कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. तब्बल 17 दिवस कॅन्टोन्मेंटवासियांचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या इतिहासात प्रथमच मोर्चा काढण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी खानापूर रोडवर रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच शाळेच्या आवारातील मैदान 25 वर्षांच्या कराराने विनामोबदला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याने सदर्न कमांडने नोटीस बजावून माहिती देण्याची सूचना केली होती. हा करार बेकायदेशीर असल्याचे सांगितल्याने टर्फ मैदानाचे उद्घाटन रखडले आहे.
गुन्हेगारीने बेळगावकरांना दिला भलताच ताप

सरत्या वर्षात गुन्हेगारीने बेळगावकरांना भलताच ताप दिला आहे. एकही दिवस असा नाही की त्यादिवशी गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडली नाही. वर्षभर खून, चोरी, दरोडे, फसवणूक आणि तत्सम गुन्ह्यांनी बेळगावकरांना ग्रासले. स्पष्टच सांगायचे तर पोलीस दलाने आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलेली आहे. ही गुन्हेगारी लवकरात लवकर संपुष्टात आणली नाही तर बेळगावचा चेहरा वेगळ्याच पद्धतीने सामोरा येईल. साधारण आढावा घेताना….
जानेवारी-पैशांचा पाऊस पाडणारा बाबा गाजला
जानेवारी महिन्यात बरसात बाबाने चांगलेच चकविले. सावज हेरून 11 लाखांचे 11 कोटी करून देण्याची बतावणी करून पैशांचा पाऊस पाडणारा हा बाबा बराच गाजला. याच महिन्यात शिक्षण संस्थांमध्ये कोरोनाचा स्फोट झाला. रिक्षाचालकाच्या खुनाने बेळगाव हादरले. तर 5 कोटींच्या 31 कार हस्तगत करण्यात कोल्हापूरच्या पोलिसांनी यश मिळविले. त्यामध्ये बेळगावच्या गुन्हेगाराचा समावेश होता. अभिषेक पुजारी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. भूमाफियांनी आपले फास आवळून करोडोंची जमीन घशात घालण्याचा घाट घातला.
फेब्रुवारी- बेळगावकरांनी डोळे विस्फारले
कोंडसकोप येथे मानवी कवटी सापडल्याने तर्कवितर्कांना ऊत आला. केपीटीसीएलमधून सव्वातीन कोटींचा गैरव्यवहार उघड झाला. दुतोंडी साप विक्री केल्याबद्दल दोघा जणांना अटक करण्यात आली तर बनावट आरटीपीसीआर रॅकेटने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. डॉन तस्लीम खून प्रकरणातील संशयिताचा कारागृहात मृत्यू झाला. तर पेट्रोलपंपावरील कामगारानेच आपल्या मालकाला गंडविल्याने तो चर्चेचा विषय ठरला. दोन मुलांसह अरगन तलाव येथे आईने केलेल्या आत्महत्येमुळे बेळगावकरांनी डोळे विस्फारले. याच महिन्यात बेळगुंदी येथे अज्ञाताचा खून करण्यात आला. वन खात्याच्या कार्यालयातूनच दीड लाखाचे चंदन चोरीचे प्रकरणही गाजले.
मार्च- डोळ्यात मिरचीपूड टाकून खून
बांधकाम व्यावसायिक दो•बोम्मण्णावर यांचा डोळ्यात मिरचीपूड टाकून खून करण्यात आला. हे प्रकरण भलतेच गाजले. किल्ला तलावाजवळ हिना कौसर नदाफ हीचा तिचा पती मंजुर इलाही नदाफ याने खून केला. भरदुपारी ही घटना घडली. तर हनुमाननगर येथे 13 लाखांच्या घरफोडीने पुन्हा एकदा चोर शिरजोर असल्याचे जाणवले. याच महिन्यात होनग्यामध्येसुद्धा दरोडा पडला. खंडणी प्रकरणात गाजलेला बन्नंजेराजा याला दोषी ठरविण्यात आले.
एप्रिल-आत्महत्येमुळे राज्यभर पडसाद
रणकुंडये येथे नागेश पाटील यांची भीषण हत्या करण्यात आली. अस्टिस्टंट मॅनेजर पोस्टचे आमिष दाखवून एमजी ग्रुपला हरेन देसाई या भामट्याने 4 कोटी 41 लाखांचा चुना लावला. पिस्तुल दाखवून लूट करण्याचा प्रकार घडला. हिंडलगा येथील संतोष पाटील यांनी बिलाची रक्कम अदा न झाल्याने उडुपी येथे आत्महत्या केली आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. करडीगुद्दी येथे कॅम्बेल स्टोअरसमोरच तलवारीसह तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
मे -मराठी तरुणांना अडकविण्याचा प्रयत्न
मे मध्ये गोवा येथे झालेल्या अपघातात बेळगावच्या तिघा जणांचा मृत्यू झाला. मणगुत्ती क्रॉसजवळ बेकायदा तांदूळ जप्त केला आणि हे सत्र वर्षभर सुरू राहिले. टिळकवाडीत 12 लाखांची घरफोडी झाली. घरफोड्या करणाऱ्या त्रिकुटाला अटकही करण्यात आली. या महिन्यात एका युवकाचा खून करून मृतदेह रेल्वेरुळावर टाकला होता. पुतळा विटंबना प्रकरणी मराठी तरुणांना अडकविण्याचा प्रयत्नही याच महिन्यात झाला. याच महिन्यात महेश कामाण्णाचे या कार मेकॅनिकचा त्यांच्या पालकासमोरच खून झाल्याची घटना घडली.
जून-युवकाच्या खुनामुळे गौंडवाड पेटले

कोन्नूर येथे पीएसआयच्या मुलावरच हल्ला करण्यात आला. चन्नम्मानगर येथे जीवे मारण्याची धमकी देऊन थरारक दरोडा घालण्यात आला. तर नेहरुनगर येथे चार दुचाकी पेटवून खाक करण्यात आल्या. कंग्राळी बुद्रुक येथेही खुनाची घटना घडली आणि त्यापाठोपाठ वाहन हटविण्याचे कारण होऊन सतीश पाटील या युवकाचा खून होऊन गौंडवाड पेटले. हे प्रकरण तालुक्यासाठी धक्कादायक ठरले. तर फरारी विशालसिंगवर पोलिसांनीच गोळीबार केला तर दुसरीकडे तिहेरी खून प्रकरणातील आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष सुटला. अग्निपथवरून याच महिन्यात चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन झाले.
जुलै-शीरविरहीत मृतदेहामुळे खळबळ
दुभाजकाला धडक दिल्याने हलगा येथे तरुणाचा मृत्यू झाला तर मुतगा येथे शिवारातील विहिरीमध्ये शीरविरहीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. बेळगुंदीच्या जवानाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू याच महिन्यात झाला. हिंडलगा कारागृहातील सिद्धाप्पा हसरे या कच्च्या कैद्याचा मृत्यू झाला.
ऑगस्ट-चोरट्यांचा हैदोस
कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांच्या दोन गटात जबर हाणामारी झाली. कटरचा वापर करणे हे अतिशय धक्कादायक ठरले. या महिन्यात कॅम्प येथे अरहाण बेपारी याला ट्रकने चिरडले आणि कॅम्प परिसरात तणाव वाढला, दगडफेक झाली. या अपघातानंतर अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली. परंतु पुन्हा जैसे थे सुरूच राहिले. याच महिन्यात सराफांना फसविणाऱ्या जोडगोळींना पोलिसांनी गजाआड केले. ऋषभ अल्मा याने 18 हजाराची नोकरी देण्याचे सांगून महिलांना ठकविले. पिरनवाडीत सव्वातीन लाखाची घरफोडी झाली. मैत्रीदिनी पंतनगरजवळ दुचाकीला टिप्परने धडक देऊन दोन जीवलग मित्र मृत पावले. निवृत्त वनाधिकाऱ्यांना धमकावून 4 लाखाची लूट केली. वनविभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याची कार अडवून पिस्तुल दाखवून पैसे लुटण्यात आले. येळ्ळूरमध्ये सराफी दुकान व इंडियन गॅसचे कार्यालय फोडून चोरट्यांनी हैदोस घातला. गौंडवाड येथे पुन्हा 15 दिवसांनी दगडफेक झाली.
सप्टेंबर -गोकाक येथे ढगफुटीचा अनुभव
फिश मार्केट येथे रिअल इस्टेटधारक सुधीर भगवानदास कांबळे याचा खून करण्यात आला. पोलिसांनी तपास लावत या खूनप्रकरणी पत्नी रोहिणी, मुलगी स्नेहा व तिचा मित्र अक्षय विटकर यांना अटक केली. गोकाकमधील सराफाला 40 लाखाला लुटले. हुक्केरी तालुक्यातील होसूर गावातील मुलाचे शीर धडावेगळे करून मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात टाकण्यात आला. हे प्रकरणही पोलिसांनी उलघडले. 26 रोजी पोलीस कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. बुदिगोप्प येथे तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू झाला. अथणीमध्ये अर्भकाचे अपहरण करणाऱ्या महिलेला सहा तासांत गजाआड केले. रामदुर्ग तालुक्यातील होसूर येथे युवकाचा खून झाला. काकती पोलिसांच्या विरोधात हुल्यानूर ग्रामस्थांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. झाड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यूही याच महिन्यात झाला. दागिने पळविणाऱ्यांनी म्हशी पळविल्याची घटना घडली. एसीबीचे सर्व अधिकार लोकायुक्तांकडे देण्याचे आदेश याच महिन्यात दिले. वनमंत्री उमेश कत्ती यांचे निधनही मंगळवार दि. 6 रोजी बेंगळूर येथे झाले. नेगिनाळ मठाधीश श्री बसवलिंग स्वामीजींनीही याच महिन्यात आत्महत्या केली. सुळगा (हिं) येथे वीज स्पर्शाने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर गोकाक येथे ढगफुटीचा अनुभव आला.
ऑक्टोबर- मांजाने घेतला बालकाचा बळी
चेन स्नॅचिंग आणि खून या महिन्यातही सुरूच राहिले. महिन्याच्या प्रारंभीच चेन स्नॅचिंगची घटना घडली. दुहेरी खुनाने सुळेभावी हादरली. शिवाजीनगर येथे शालेय विद्यार्थ्याचा भीषण खून झाला तर पतंगाच्या मांजाने बालकाचा बळी घेतला. अनगोळच्या तरुणाचा क्वॉरीत बुडून मृत्यू झाला तर विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाला. कार विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केले.
नोव्हेंबर-अनेक ठिकाणी चोरीच्या घटना

या महिन्यात खानापुरात चाकुने वार करून भीषण खून झाल्याची घटना घडली. मच्छे येथे दोन लाखांसह कारही पळविण्याचा प्रकार घडला. संगमेश्वरनगर येथे एकाकी महिलेला लुटले, बेळगुंदी येथे दोन मंदिरे फोडली, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात लॉकअप डेथची मोठी घटना घडली. यामुळे संपूर्ण राज्यभर याचे पडसाद पहावयास मिळाले. ही घटना दडपण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. बसुर्ते येथे दोन लाखांची घरफोडी करण्यात आली. शेरी गल्ली येथे 14 लाखांची घरफोडी झाली. याच महिन्यात किटवाड धरणात बुडून चार तरुणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान पिरनवाडी, शहापूर, कडोलीसह इतर ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. भारतनगर येथील युवकाचा खून करण्यात आला होता.
डिसेंबर-दुहेरी खुनाने शिंदोळी हादरली
या महिन्यात दुहेरी खुनाने शिंदोळी हादरली. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या फोन ईन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.









