महागाई भडकेल, तांबड धान्य व रस भांड कडक होईल, रोगराई कमी होईल
संतोष माने/ उचगाव
राजकारणात गोंधळ उडेल, रोहिणीचा पेरा साधेल, मेघराज कोपेल, महागाई भडकेल,तांबड धान्य व रस भांड कडक होईल,रोगराई कमी होईल, गर्वाने वागल तो संपेल, माझी मनानं सेवा करेल त्याला कांबळ्याखाली धरेन अशी भाकणूक आबादेव वायकुळे (फरांडेबाबा) यांनी केली.
वसगडे ता. करवीर येथील महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यांत प्रसिद्ध असणार्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल कैताळाच्या निनादात श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या गजरात फरांडेबाबांनी ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले, यावेळी प्रसिद्ध भाकणूक झाली.
दुपारी बाराच्या सुमारास आबादेव वायकुळे (फरांडेबाबा) महाराज मंदिरातील देवदर्शनासाठी ‘हेडाम’ खेळत मंदिरात आले. या सोहळ्या दरम्यान धनगर समाज बांधव व भाविक ढोल कैताळाच्या वालंगासह भंडारा खोबऱ्याची उधळण करत होते. या लवाज्यासह फरांडी बाबांनी देवाचे दर्शन घेतले. त्यांनी ‘श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत भाकणूक केली. भाकणूक करणारे फरांडेबाबा मंदिरासमोरील दगडी गादिवर उठून वालंगासह मंदिरामागील गादीवर विराजमान झाले. दरम्यान सकाळपासून ढोल वादनाने परिसर दणाणून गेला.भंडारा(हळद), खारका, खोबरे, लोकरीच्या उधळणीने वातावरण भक्तिमय बनले होते. मंदिर परिसर भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला होता. या धार्मिक कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दाखवली. दुपारी मुख्य धार्मिक विधिस प्रारंभ झाला.सायंकाळी मानाची पालखी व ऊस गाड्यांची मिरवणूक खारीक खोबऱ्याच्या उधळणीत काढण्यात आली. यावेळी ऊस गाड्यांची लूट करण्यात येऊन भाविकांनी उसाचा आस्वाद घेतला.
यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
तर यात्रेत मेवा मिठाईची दुकाने, पाळणे, खेळण्याची दुकाने, फूड स्टॉल, यांनी परिसरात गर्दी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेकाळात सर्व सुविधांची चोख व्यवस्था केली आहे. दरम्यान सकाळी फरांडेबाबा यांनी पुढच्या वर्षी यात्रेला वारस म्हणून तात्याराव वायकुळे यांच्याकडे विडा दिला.
या कार्यक्रमास मानकरी पोलीस पाटील संजय पाटील, गुंडा पाटील, कुलभूषण सुर्यवंशी, सरपंच नेमगोंडा पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामसेवक जीडी गीरीगोसावी, रंगा धनगर, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीचे सदस्य, धनगर समाज बांधव, पुजारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.