संदीप मोटे, शिवा दड्डी यांची प्रेक्षणिय विजय
वार्ताहर/सांबरा
मुतगा येथे श्री हनुमान कुस्ती संघटना व ग्रामस्थ आयोजित हनुमान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व शानवीर कोहली पंजाब ही कुस्ती तब्बल 45 मि. नंतर डावप्रतिडावाने झुंजत बरोबरीत राहिली. महाराष्ट्राच्या संदीप मोटेने दिल्लीच्या हरिषकुमारला 10 व्या मिनिटात घुटणा डावावरती प्रेक्षणीय विजय मिळवून उपस्थित कुस्ती शैकीनांच्याकडून वाहवा मिळविली. प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व कोहली आखाड्याच्या शानवीर कोहली पंजाब ही कुस्ती हनुमान कुस्तीगीर संघटना, गाव सुधारण मंडळ, देवस्थान कमिटी व पंच कमिटी यांच्यावतीने लावण्यात आली. या कुस्तीत पहिले 5 मिनिटे दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली.

6 व्या मिनिटाला शानवीर कोहलीने एकेरीपट काढत पृथ्वीराज पाटीलला खाली घेत कब्जा मिळविला व मानेवरती घुटना ठेऊन फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारून पृथ्वीराजने बाहेर पडण्याचे प्रयत्न करताना शानवीरने पुन्हा पृथ्वीराजला खाली घेत पायंदळ घिस्सावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. मानेवरचा कस काढुन हाताची सांड चढवत झोळ बांधण्याचा प्रयत्न केला. पण ताकदीने मजबूत असलेल्या पृथ्वीराजने त्यातून सुटका करून घेतली. 21 व्या मिनिटाला पुन्हा शानवीरने दुहेरीपट काढून पृथ्वीराजवर कब्जा मिळविला. पायाला एकलांगी भरून पृथ्वीराजला फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून तो असफल ठरला. तब्बल 45 मिनिटानंतर दोन्ही मल्लांनी एकमेकांची कस काढून चित करण्याचा प्रयत्न केल। पण असफल ठरले. त्यामुळे पंच कमिटीने कुस्ती बरोबरीत सोडविली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी संदीप मोटे व राष्ट्रीय चॅम्पियन हरिश कुमार दिल्ली ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला हरिश कुमारने एकेरीपट काढून संदीप मोटेला खाली घेत घिश्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून संदीप मोटे सुटका करून घेतली. 5 मिनिटाला संदीप मोटेने एकेरीपट काढून हरिशला खाली घेत, मानेचा कस काढून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून हरिशाने सुटका करून घेतली. 10 व्या निमिटाला संदीप मोटेने एकेरीपट काढून हरिश कुमारला खाली घेत एकचाक डावाची मजबूत पकड घेऊन फिरविण्याचा प्रयत्न करत असताना मानेवरती घुटना ठेऊन घुटणा डावावरती प्रेक्षणिय विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती करण दोहा दिल्ली व शिवा दड्डी निर्वानट्टी ही कुस्ती माजी सैनिक संघटनेतर्फे लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला करण दोहाने शिवा दड्डीला खाली घेत पोकळ घिश्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण शिवाने त्यातून सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला शिवा दड्डीने एकेरीपट काढून घिश्या डावावरती करणला चित करून विजय मिळविला.
चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती विश्वजीत रूपनर कराड यांनी राजवर्धन पाटील याला घुटण्या डाववरती पराभव केला. पाचव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी व प्रथमेश पाटील बेनापूर ही कुस्ती डावप्रतिडावाने जवळपास 15 मिनिटे झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत राहिली.सहाव्या क्रमांकाच्या कुस्ती विशाल सांगलीने प्रेम कंग्राळीचा आकडी डावावरती पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्ती कार्तिक इंगळगीने बाळू गोडके कोल्हापूर याला गुणावर पराभूत केले. आठव्या क्रमांकाच्या कुस्ती पृथ्वीराज पाटील कंग्राळीने महेश तिर्थकुंडेचा झोळी डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत चिन्मय येळ्ळूर न आल्याने प्रविण निलजीला विजय घोषित करण्यात आले.

दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवा तेलीने पंकज चापगावचा एकचाक डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे भुमीपूत्र मुतगे भरत मुतगे, शुभम मुतगे, आर्यन मुतगे, हर्ष कंग्राळी, गजानन मुतगे, सिद्धार्थ सांबरा, बसवंत सांबरा, करण खादरवाडी, पृथ्वीराज औचारट्टी, दियांश भाकोजी शहापूर, बालाजी कंग्राळी, रिद्धांत मजगाव, अनुज मुतगे, लखन कंग्राळी, परशराम मुतगे आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करत विजय मिळविला. या मैदानात नवीन मुतगे, भावकाण्णा मुतगे, सुधीर बिर्जे, सुहास पाटील, शिवाजी पाटील, गणपत बनोसी, हणमंत पाटील, विलास पाटील, श्रीकांत पाटील, बाहुबली बस्तवाड यांनी काम पाहिले. तर कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले यांनी केले. तर सर्व कुस्ती शौकीनांना येळगुडचे ओंमकार धाबाडे व सहकाऱ्यांनी आपल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकीनांना खेळवून ठेवले.









