दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पुष्पलता यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. ती बऱ्याच काळापासून वृद्धापकालीन आजारांमुळे त्रस्त होती. त्यांच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. पुष्पलता यांनी त्यांच्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत खास ओळख निर्माण केली होती. उत्तम अभिनयासोबतच एक उत्तम नृत्यांगना आणि निर्माती म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला होता.
पुष्पलता यांनी 1958 मध्ये ‘सेनकोट्टाई सिंघम’ या तामिळी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1969 मध्ये त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश करत ‘नर्स’ चित्रपटात काम केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. यामध्ये एमजी रामचंद्रन आणि कमल हासन सारखे मोठे अभिनेते होते.
1999 मध्ये ‘पूवसम’ चित्रपटानंतर पुष्पलता यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी अध्यात्म आणि समाजसेवेकडे लक्ष वळवले. चित्रपटांनंतर, त्यांनी समाजसेवा आणि आध्यात्मिक शांतीच्या शोधात एक नवीन दिशा स्वीकारली. भारतीय चित्रपटसृष्टीतील पुष्पलता यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. दक्षिण चित्रपट उद्योगासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे.









