दीर्घकाळापासून होते आजारी : लखनौमध्ये झाले अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था/ लखनौ
प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. राणा हे दीर्घकाळापासून आजारी होते. मुनव्वर राणा यांच्यावर लखनौच्या ऐशबाग दफनभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
71 वर्षीय राणा यांना किडनी, मधूमेह आणि रक्तदाबाचा आजार होता. गुरुवारी पहाटे प्रकृती बिघडल्यावर तयंना लखनौच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सप प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत राणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उर्दु शायर राणा यांना ‘शाहदाबा’ या कवितेसाठी 2014 मध्ये साहित्य अकॅडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तरप्रदेशच्या रायबरेली येथे राणा यांचा 26 नोव्हेंबर 1952 रोजी जन्म झाला होता. परंतु त्यांनी स्वत:चे बहुतांश जीवन पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे व्यतित केले होते.
राणा यांना उर्दू साहित्य आणि कवितेतील योगदानासाठी विशेषकरून गझलांसाठी ओळखले जाते. त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता ‘मां’ होती. पारंपरिक गझल शैलीत आईचे गुण या कवितेद्वारे त्यांनी मांडले होते. राणा यांना अमीर खुसरो पुरस्कार, मीर तकी मीर पुरस्कार, गालिब पुरस्कार, डॉ. जाकिर हुसैन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या कवितांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.









