मेक्सिको सिटी :
अर्जेंटीनातील प्रख्यात गायक फेडे डोरकाज याच्यावर मेक्सिकोत गोळी झाडण्यात आली आहे. डोरकाजच्या मानेत ही गोळी शिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लुटीच्या प्रयत्नादरम्यान झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फेडे हा मेक्सिकोतील प्रसिद्ध नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोहोचला होता. फेडे नृत्याचा सराव केल्यावर कार चालवत स्वत:च्या वास्तव्यसुविधेकडे जात असताना वाटेत त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीत घडली आहे. फेडेच्या हत्येचे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस पूर्ण शहरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत आहेत. यादरम्यान पोलिसांना एका फुटेजमध्ये बाइक स्वार 4 संशयित दिसून आले आहेत. चारही संशयित स्वत:च्या बाइकद्वारे पळ काढताना फुटेजमध्ये दिसून आले. फेडे हा मेक्सिकन अभिनेत्री मारियाना अविला हिला डेट करत होता. मेक्सिकोच्या नृत्य स्पर्धेत फेडे आणि मारियाना यांचा कार्यक्रम सादर होणार होता, परंतु त्यापूर्वी फेडेची हत्या करण्यात आली आहे. फेडेचा जन्म अर्जेंटीनामध्ये झाला होता. वयाच्या 13 व्या वर्षी तो परिवारासोबत स्पेनमध्ये स्थलांतरित झाला होता. 29 वर्षीय फेडेने 2024 मध्ये गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते आणि काही काळातच तो अर्जेंटीनाच्या प्रसिद्ध गायकाच्या यादीत स्थान मिळवू शकला होता.









