खानापूर : माणिकवाडी येथील व्यंकाप्पा मयेकर याचा हॉटेल मालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेला होता. याबाबत व्यंकाप्पा मयेकर यांच्या नातेवाईकानी हॉटेल मालकाविरोधात खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. मात्र खानापूर पोलिसांकडून आरोपीवर कोणतीच कारवाई केली नसल्याने आरोपी मोकाट फिरत आहेत. याबाबत व्यंकाप्पाच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी नुकतीच एआयसीसी सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खानापूर पोलीस तपासात दिरंगाई करत असून आरोपीनाच पाठिशी घालण्यात येत असल्याची तक्रार मांडली. यावेळी माणिकवाडी ग्रामस्थ आणि व्यंकाप्पा मयेकर याचे नातेवाईक, पंचमंडळी उपस्थित होते.
माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेऊन पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांना बोलावून घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी निरीक्षक लालसाब गवंडी यांनी काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येत आहेत. तसेच उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. असे सांगितले. माजी आमदार अंजली निंबाळकर लालसाब गवंडी यांना तपास तातडीने पूर्ण करून दोषांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी देवाप्पा गावडे, नागेश गावडा, परशराम मयेकर, सहदेव गावडे, परशराम गोरल, हणमंत होनगेकर, विनायक मयेकर यासह ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते.









