गरजेच्या सर्व गोष्टी उपलब्ध
सद्यकाळात प्रत्येकाची स्वतःचे एक घर खरेदी करण्याची इच्छा असते, परंतु हे प्रत्यक्षात सोपे नसते. छोटे असो किंवा मोठे स्वतःचे घर असावे असे बोलले जाते. परंतु तुम्ही कधी एखाद्या बसलाच घराचे स्वरुप देण्याविषयी विचार केला आहे का? एका बसमध्ये घरासारख्या सुविधा निर्माण करणे जवळपास अशक्य आहे, परंतु अमेरिकेतील एका कुटुंबाने हे करून दाखविले आहे. एक दांपत्य आणि त्यांची 6 मुले म्हणजेच एकूण 8 जणांचे हे कुटुंब डबल डेकरमध्ये वास्तव्य करत आहे.
डेन आयर्ली, त्यांची पत्नी आणि 6 मुले एकत्र एकाच बसमध्ये राहतात. 6 जणांचे मोठे कुटुंब बसमध्ये राहत असल्याने ते परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. या कुटुंबाचे इन्स्टाग्रामवर अकौंट असून त्यावर ते स्वतःचा मजेशीर प्रवास तसेच बसयुक्त घराशी निगडित व्हिडिओ पोस्ट करत असतात.

या कुटुंबाची लाइफस्टाइल अनेकांना आवडत असली तरीही काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. लोक अनेकदा त्यांच्या मुलांच्या छोटय़ाछोटय़ा खोल्यांची तुलना शवपेटींसोबत करतात. डेन यांच्या घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, स्वयंपाकघरापासून बाथरुम अणि बेडरुम तसेच फ्रीज देखील उपलब्ध आहे. मागील वर्षी त्यांनी लोकांना या बसच्या आतील टूर करविली होती, जी अत्यंत व्हायरल झाली होती.
या बसमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूला दोन पॅसेंजर सीट्स आहेत, त्याच्या बाजूला शू रॅक निर्माण करण्यात आला आहे. त्यापुढे फ्रीज आणि मग किचन, सिंक आणि सोफा ठेवण्यात आला आहे. बसच्या पुढील भागात बाथरुम तयार करण्यात आले आहे. वरच्या भागात शॉवरसोबत बाथरुम, मुलांसाठी छोटेछोटे बेड, वॉशिंग मशीन आणि एक मोठी बेडरुम तयार करण्यात आली आहे. या कुटुंबाच्या या इन्स्टाग्राम पेजवर 1 लाख 33 हजार फॉलोअर्स आहेत.









