महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल कौतुकोद्गार
बेळगाव : मराठा मंदिर येथे डॉ. अनुपमा जोशी संचालित ‘फेम फिएस्टा’ उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उत्सवात बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील 70 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांनाही महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या चौदा वर्षांपासून डॉ. अनुपमा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘फेम फिएस्टा’ उत्सव आयोजित करतात. यंदाचा 15 वा शेवटचा उत्सव असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. यानिमित्त महिलांसाठी पाककला, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. पाककला स्पर्धेत 50 महिलांनी तर चित्रकला स्पर्धेत 200 हून अधिक मुलांनी भाग घेतला. या स्पर्धांच्या बरोबरीनेच सायंकाळी महिलांनी नृत्याविष्कार सादर करून वाहवा मिळविली.
दरवर्षी या उत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो. यावर्षी रिक्षाचालक प्रभा बिशीरोट्टी, प्रेमा उपाध्ये, गीता सुतार, अनिता कणबर्गी, शुभांगी जिनगौडा यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह डॉ. अनुपमा यांनी दीपप्रज्वलन केले. सत्कारमूर्तीनी ‘फेम फिएस्टा’च्या यशस्वीतेबद्दल कौतुकोद्गार काढले. य् ाानंतर प्रेमा उपाध्ये यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. नीलम गुत्तीगोळी आणि समूहाने ‘फिनॉमिनल वुमन’ या विषयावर नृत्य सादर केले. त्यानंतर आर्याच्या ‘स्वीट एंजल’, ज्योती बालोच्या ‘वंडर वुमन’, संगीताच्या ‘सिझलिंग बटरफ्लाईज’चा नृत्याविष्कार झाला. विशारद नृत्य शाळेच्या कलाकारांनी समूहनृत्य सादर केले. कार्यक्रमानंतर फेम फिएस्टाच्या पंधरा वर्षांच्या प्रवासाची चित्रफीत दाखविण्यात आली. डॉ. अनुपमा जोशी यांनी या सर्व प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच आनंद चौगुले, प्रवीण प्रभू, विजय बांदेकर, दीपा मंगळवेढे या सर्वांनी 15 वर्षे उत्तम सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. सर्व स्वयंसेवकांचा आणि प्रायोजक ‘लोकमान्य सोसायटी’, आदित्य मिल्क, मिलांज फूड स्टोअर, वाईल्ड शुगर व रचना ग्राफिक्स यांचे आभार मानले.
उत्सवात झालेल्या विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे- पाककला सॅलड- 1. प्रतिभा माने, 2. योजना नियोगी, 3. सुनीता साडीवाले, 4. अश्विनी मालघन. गोड पदार्थ- 1. अश्विनी मालघन, 2. प्रतिभा माने, 3. सुनीता साडीवाले, 4. अश्विनी चव्हाण. चित्रकला ग्रुप पहिला- 1. युगा भंडारे, 2. सुमित नारायणी, 3. दिग्विजय कोवाडकर, 4. वृंदा कांदेकर, 5. स्वरा हावळ. ग्रुप दुसरा- 1. स्वरांजली कारेकर, 2. पूर्वा जाधव, 3. रिहा शिंदे, 4. वैभवी भडांगे, 5. प्रणिती कुलकर्णी. ग्रुप 3- 1. निहार मजुकर, 2. सर्वेश रेवणकर, 3. यश पाटील, 4. समर्थ सामंत, 5. वरदा जकाती यांनी पटकाविला. स्वागत करून अरुणा नाईक यांनी सूत्रसंचालन केले.









