लोणावळा / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याचा प्लॅन आखला गेल्याची खोटी माहिती पोलीस नियंत्रण कक्षास 100 क्रमांकावर देणार्या माथेफिरुला लोणावळ्यातून ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आले.
अविनाश आप्पा वाघमारे (वय 36, रा. रमाबाई आंबेडकर नगर वसंतराव नाईक मार्ग, साठे चाळ घाटकोपर, ईस्ट मुंबई) असे या माथेफिरुचे नाव आहे. रविवारी दुपारी 2.48 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे हा लोणावळ्यातील साईकृपा हॉटेल येथे आलेला होता. दारूच्या नशेत असलेल्या वाघमारे याची हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांच्याशी पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याच्या मुद्द्यावर बाचाबाची झाली. त्याने हाच राग मनात धरून हॉटेल मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण मोबाईलवरून 100 नंबरला कॉल केला व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी माहिती फोनवरुन दिली.
अधिक वाचा, मला धमक्यांचं अप्रूप नाही : एकनाथ शिंदे
या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ माजली. ज्या नंबरवरून फोन आला होता, त्याचा शोध घेतला असता अविनाश वाघमारे नावाच्या व्यक्तीने हा फोन केला असल्याचे समजले. त्याला लोणावळ्यातून ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर याप्रकरणी तपास करत आहेत.








