जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याकडून स्पष्टीकरण
बेळगाव : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या भारतीय सेनेच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बेळगावातील घरावर एका संघटनेने हल्ला केल्याची माहिती काहींनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती आणि फोटो बनावट असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले आहे. अनिस उद्दीन नामक एका व्यक्तीने एक्स अकाऊंटवर ट्वीट करत भारतीय सेनेच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावातील पतीच्या घरावर हल्ला केल्याची माहिती आणि फोटो व्हायरल केला होता.
इतकेच नव्हे तर घराचे नुकसान झालेला फोटो अपलोड करण्यासह हल्ल्याच्या भीतीने कुरेशी कुटुंबीय दिल्लीला स्थलांतरित झाल्याचेदेखील सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहे. मात्र याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर यांनी अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविण्यात आली आहे. नागरिकांनी याकडे लक्ष देऊ नये, असे सांगितले आहे. ऑपरेशन सिंदूर या विशेष कारवाईची माहिती पत्रकार परिषद घेऊन भारतीय सेनेच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली होती. त्यांचे पती कर्नल ताजाउद्दीन बागेवाडी हे गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावचे आहेत. याच कारणातून काही तरुणांनी त्यांच्या घरावर हल्ला केल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरविण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.









