घरांवर झाड पडल्याने नुकसानी : काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित
म्हापसा : शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे बार्देश तालुक्यात एकूण 8 ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची घटना म्हापसा अग्निशामक दलात नोंद झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर दलाचे अधिकारी कृष्णा पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडे कापून बाजूला केली. कीर्ती विद्यालय शिवोली येथे भले मोठे आंब्याचे झाड वीज खांबावर पडून रस्त्यावर पडले यामुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन उपअधिकारी अशोक परब यांच्या मार्गदर्शनाखाली झाड कापून बाजूला केले. रेवोडा मुनशीवाडा येथे घरावर पडलेले झाड फायर फायटर विष्णू गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कापून बाजूला करण्यात आले. गावसवाडा म्हापसा येथे कार्व्हालो वॉशइंग सेंटर जवळ झाड पडले असता ते पी. शेटगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापून बाजूला करण्यात आले. कात्रेश्वर बंदीरवाडा शापोरा येथे माड कोसळला तो सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली कापून बाजूला केला.
बस्तोडा येथे पंचायतीजवळील घरावर पडलेले झाड उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कापून बाजूला करण्यात आले. एकोशी पोंबुर्फा येथे फ्रँकी गॅरेजजवळ झाड वीज खांब्यावर पडले असता ते ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली कापून बाजूला केले. ओळावली पोंबुर्फा येथे राजू म्हांबरे यांच्या दुकानाजवळ पडलेले झाड अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी कापून बाजूला केले. पोंबुर्फा वळावली येथे झाड वीज खांबावर पडल्याने वीज पुरवडा खंडित झाला. वीज खात्याचे कर्मचारी धो-धो पावसाची पर्वा न करता वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात मग्न होते. कळंगूट बाबरेश्वर देवस्थानाजवळ एका घरावर पडलेले आंब्याचे झाड पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी कृष्णा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली फायर फायटर नरेंद्र शेट्यो, लाडू सावंत, ऊद्रेश पांढरे, भावेश शिरोडकर, स्वप्नील नाईक, विराज खांडोळकर, प्रल्हाद कोटकर, राजकिरण पेडणेकर, विदेश म्हापसेकर यांनी हे झाड कापून बाजूला केले.









