कार, दुचाकींवर झाडे कोसळल्याने नुकसान
म्हापसा : दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यात झाडांची बरीच पडझड झाली. काही ठिकाणी झाडे मुळातून उन्मळून रस्त्यावर कोसळली. नेऊल वेरे येथे शेडमध्ये ठेवलेल्या कारवर आब्यांचे झाड पडल्याने कार गाड्यांचे बरेच नुकसान झाले. संध्याकाळी सिकेरी कांदोळी येथे ताज हॉटेलजवळ बोरीचे झाड तीन दुचाकींवर पडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी क्रिष्णा पर्रीकर यानी दिलेल्या माहितीनुसार, नेऊल येथे चर्चसमोर भलेमोठे पुरातन आब्यांचे झाडे पावसामुळे पडले. घटनेची माहिती मिळताच पीळर्ण अग्निशामन दलाच्या जवानानी घटनास्थळी धाव घेऊन सदर झाड कापून बाजूस केले. सकाळी 9 वा. च्या दरम्यान मानशेर वेरे येथे एक भलेमोठे झाड शेडवर पडून कार क्रमांक जीए 03 झेड 2310 चा दर्शनी भागाचा चुरडा झाला. याचबरोबर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान भलेमोठे भेंडीचे झाड कुचेली पेट्रोल पंपजवळ पडले. म्हापसा अग्निशामन दलाच्या जवानानी झाड कापून बाजूला केले. दुपारी पावणे तीन वाजताच्या दरम्यान जयदेव वाडा नास्नोडा येथे सरस्वती घाडी यांच्या घरावर कोकमचे झाड पडून त्यांचे 20 हजार ऊपयांचे नुकसान झाले. ताज हॉली सिकेरी बार्देश येथे भलेमोठे बोरीचे झाड पडल्याने 3 दुचाकींचे नुकसान झाले.
पीळर्ण दलाचे जवान एन. जी. शेट्यो, एस. जी. च्यारी, एच. व्हाय. हंसकट्टी, नारायण सावळ, प्रथमेश म्हालवार, जे. बळी, एस मांद्रेकर, फायर फायटर एल सावंत, डि. ए. गावडे, व्ही. पी. पाटील, डि. सी. सिनारी, आर. आर. पिळर्णकर, ऊद्रेश पांढरे, आर. बी. पेडणेकर, तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे जवान विष्णू गावस, गोविंद देसाई, परेश मांद्रेकर, अक्षय सावंत, दिप्तेश गावडे, योगेश आमोणकर, सुनील बाणावलीकर, भिकाजी काळोजी, चंद्रकांत नाईक, साईदत्त आरोलकर यांनी झाडे कापून बाजूला केली तसेच झाडाखाली सापडलेल्या कार बाजूला केल्या. म्हापसा अग्निशामाक दलाचे अधिकारी क्रिष्णा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी बरेच परिश्रम घेऊन झाडे कापली व रस्ता मोकळा केला.









