10 ते 15 रुपये प्रतिकिलो दराने विक्री
बेळगाव : मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसू लागला आहे. वाहतुकीचा खर्चदेखील निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. आज-उद्या दर वाढेल या आशेने असलेल्या उत्पादकांना अद्यापही समाधानकारक भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उत्पादक अडचणीत आले आहेत. एपीएमसी आणि जय किसान भाजीमार्केटमधील घाऊक बाजारात टोमॅटोला केवळ 4 ते 5 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांना केलेला खर्चदेखील मिळत नसल्याचे दिसत आहे. किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होऊ लागला आहे. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळत असला तरी उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. बाजारात टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे. लग्नसराई, यात्रा-जत्रा उत्साहात सुरू आहेत. त्यामुळे टोमॅटोची खरेदी करणे ग्राहकांना सोयीस्कर होऊ लागले आहे. गतवर्षी मे महिन्यात टोमॅटोचा दर प्रतिकिलो 80 रुपये झाला होता. दरम्यान टोमॅटोची खरेदी करणे सर्वसामान्यांना कठीण झाले होते. मात्र यंदा टोमॅटोचा दर पूर्णपणे घसरला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो स्वस्त झाला आहे. एपीएमसी बाजारात 22 किलो ट्रेच्या टोमॅटोची किंमत 200 ते 250 रुपये होऊ लागली आहे.









