किरकोळ बाजारात 70 ते 80 रु. किलो विक्री
बेळगाव : मागील काही दिवसांपासून वाढलेल्या टोमॅटोचा दर कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 120 रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो 70 ते 80 रुपये झाला. त्यामुळे काहीसा आवाक्यात आल्याचे बोलले जात आहे. महिन्याभरापासून टोमॅटोच्या दरात वाढ झाली होती. किरकोळ बाजारात 120 रुपये किलो टोमॅटो विकला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना टोमॅटो नको म्हणण्याची वेळ आली होती. मात्र शुक्रवारी बाजारपेठेत टोमॅटोचा दर कमी झाल्याचे पहायला मिळाले. आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. एरव्ही 20 ते 30 रुपये किलो विकल्या जाणाऱ्या टोमॅटोने शंभरी पार केली होती. त्यामुळे गृहिणी, हॉटेल व्यावसायिकांचे बजेट कोलमडले होते. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोचा वापर कमी झाला होता. मात्र आता टोमॅटो दरात घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.









