भाजीपालाऐवजी अंड्यांना पसंती, हळुहळू दरात घट
बेळगाव : पाऊस आणि थंडी सुरू झाली की, चिकन आणि अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे दरदेखील वाढतात. मात्र उलट झाले आहे. पाऊस आणि थंडी जाणवत असली तरी चिकन आणि अंड्यांच्या दरात घसरण होऊ लागली आहे. 260 रुपये प्रतिकिलो असणारे चिकन 200 रुपये किलो झाले आहे. तर 560 रुपये शेकडा असणारी अंडी 510 रुपये झाली आहेत. चिकनचा दर हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे खवय्यांची चंगळ पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षात कोरोना, बर्डफ्ल्यू आणि लम्पीच्या रोगामुळे पोल्ट्री आणि चिकन विक्रेत्यांना फटका बसला होता. मात्र यंदा सुरळीत व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आणि चिकन विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारठादेखील निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे चिकन आणि अंड्यांच्या मागणीत वाढ होणार आहे, अशी अपेक्षा विक्रेत्यांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, अंडी आणि चिकनचे दर कमी होत असल्याने नागरिक पसंती देऊ लागले आहेत. डाळी, कडधान्य, टोमॅटो आणि इतर साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना डाळी आणि टोमॅटो नको म्हणण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत चिकनचा दर आवाक्यात आल्याने काहीजण अंडी आणि चिकनलाच पसंती देऊ लागले आहेत. सर्रास भाजीपाला प्रति किलो 60 रुपयांच्यापुढे गेला आहे. त्यामुळे अंड्यांना अधिक पसंती दिली जात आहे. भाजीपाल्याच्या तुलनेत अंड्यांचा दर कमी असल्याने अंड्यांची विक्री वाढू लागली आहे. अंडी चिकनच्या तुलनेत मटणचा दर मात्र स्थिर आहे. 680 रुपये प्रतिकिलो मटण विक्री होऊ लागले आहे.
खवय्यांकडून मागणी वाढली
पाऊस आणि थंडीच्या वातावरणात अंडी आणि चिकनच्या दरात काहीशी वाढ होते. सध्या अंडी आणि चिकनच्या दरात हळुहळू घट होऊ लागली आहे. 260 रुपये असणारे चिकन सध्या 200 रुपये किलो झाले आहे. खवय्यांकडून मागणी वाढू लागली आहे.
– उदय घोडके (मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष)









