व्हिडिओ शेअर करणाऱया व्यक्तीला अटक
वृत्तसंस्था / शिलाँग
मेघालयमध्ये ईव्हीएमबाबत खोटी माहिती व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी ही माहिती दिली आहे. 16 फेब्रुवारी रोजी आर संगमा नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर ईव्हीएमचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे जात असल्याचा दावा करण्यात आला होता.
व्हायरल व्हिडिओप्रकरणी रोंगजेंग विधानसभा मतदारसंघाचे पीठासन अधिकाऱयांनी तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी केली असता ईव्हीएमशी संबंधित दावा खोटा असल्याचे आढळून आले. यानंतर आयपीसी कलम 171 जी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. निवडणुकीशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याचा आरोप संबंधितावर करण्यात आला आहे.
ईशान्येतील तीन राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान झाले. तर, मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील. या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा असून बहुमताचा आकडा 31 आहे.









