कडेगाव :
कडेगाव तालुक्यातील विहापूर ग्रामपंचायतीमध्ये बनावट सही आणि शिक्के वापरून बोगस मालमत्ता उतारा तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सरपंच सौ. अश्विनी चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रकरणाचे सविस्तर वर्णन असे आहे की, दिनांक २३ जून रोजी एका बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांशी संपर्क साधून ग्रामपंचायत घर मिळकत क्र. ५०० संदर्भात बोगस ‘नमुना ८-अ’ उतारा बँकेत सादर करण्यात आल्याची माहिती दिली. हा बनावट उतारा रंगराव विठोबा महाडिक व प्रमिला रंगराव महाडिक यांच्या नावे तयार करण्यात आला असून, मूळ मालक अधिकराव विठोबा महाडिक आणि मिनाक्षी अधिकराव महाडिक यांची नावे हेतुपुरस्सर वगळण्यात आली होती.
या उताऱ्यावर ग्रामसेवकांची बनावट सही आणि शिक्के वापरून, तो बँक व फायनान्स कंपनीत कर्जासाठी सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांनी ग्रामपंचायत रेकॉर्ड न वापरता, बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे.
सरपंच चव्हाण आणि ग्रामसेवक यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केला असता, पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. तथापि, यामध्ये सरकारी कागदपत्रांची बनावट व शासनाची फसवणूक यांचा स्पष्ट उल्लेख असल्याने, गुन्हा दाखल करावा अशी सरपंचांची मागणी आहे.
- नागरिकांनी एजंटांपासून सावध राहावे – सरपंच चव्हाण यांचे आवाहन
गावात बनावट शिक्के आणि सह्यांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या एजंटांचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता असून, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांचे शिक्के व सह्या बनावट प्रकारे वापरण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे गावातील आणि परगावी राहणाऱ्या खातेदारांनी आपल्या कागदपत्रांची खातरजमा करून घ्यावी. कोणत्याही फसवणुकीच्या प्रकारात अडकू नये यासाठी सरपंच अश्विनी चव्हाण यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.








