पुणे / वार्ताहर :
कारच्या काचेला फिल्मिंग लावून भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारला वाहतूक पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले. त्यानंतर वाहनचालकांकडे तपासणी करत असताना त्याने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा हजरजबाबीपणा आणि सजगतेने संबंधित व्यक्तीचे वाढलेले केस, दाढी, पेहराव आणि बोलण्याचा रुबाब यावरून तो पोलीस नसल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी त्याला गजाआड केले.
ओमकार विलास धर्माधिकारी (मु. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सातारा पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सागर पाडळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तक्रारदार सागर पाडळे हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत टिळक चौकात वाहतूक नियत्रंण कर्तव्यावर होते. रात्री साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास काचेला काळे फिल्मिंग असलेली कार त्यांना टिळक रस्त्याकडून केळकर रस्त्याकडे जाताना दिसली. त्यामुळे त्यांनी त्याला थांबविले. त्यावेळी त्याने आपले नाव ओमकार धर्माधिकारी असून, तो पोलीस असल्याची बतावणी केली. माझ्यावर कारवाई करू नका तुम्हाला महागात जाईल, असा दम वाहतूक पोलिसांना भरला. त्याच्या बोलण्यावरून पाडळे यांना आरोपीबाबत संशय आला. त्यांनी ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी त्याचे ओळखपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पदाबाबत विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची सहायक पोलीस निरीक्षक देवकर यांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने तो पोलीस नसून, पोलीस मित्राचे ओळखपत्र पाहून त्याने बनावट ओळखपत्र तयार केल्याची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.









