विजापूर येथील गोदामावर छापा : दोघा संशयित आरोपींना अटक : पोलीस, कृषी अधिकाऱ्यांची कारवाई
वार्ताहर/ विजापूर
येथील बनावट कीटकनाशक औषधांचे उत्पादन करणाऱ्या गोदामावर पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या कारवाईत कोट्यावधी रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील औद्योगिक भागातील एका गोदामावर करण्यात आली. कोंडगळी येथील विद्यासागर चिन्नारेड्डी मल्लबादी (वय 42), कलबुर्गी जिह्यातील बोलनी येथील अमर गुरुनाथ रेड्डी (वय 19) या दोघांकडून 1,36,98,523 रु. किमतीच्या बनावट कीटकनाशक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला साठा ‘लाइफ अॅगो केमिकल’ या कंपनीच्या नावाने बनविण्यात आला होता. ‘गोल्डन ड्रॉप क्रॉप प्रोटेक्शन’ नावाच्या बोर्डाखालील गोदामात हे आरोपी ‘लाइफ अॅगो केमिकल’ कंपनीच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यावर बनावट लेबल चिकटवून गोदामात साठवून विक्री करत होते. या अनधिकृत उत्पादनाची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
सदर यशस्वी कारवाई एएसपी रामनगौड हट्टी, डीएसपी बसवराज यलिगार, सीपीआय मल्लय्य मठपती, पीएसआय बसवराज ए. टिप्परे•ाr, कर्मचारी अमगोंडा बिरादार, रेश्मा सुतार तसेच पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टीमने केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी अधिकृत माहिती दिली आहे.









