सांगली :
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट कीटकनाशकांच्या टोळीचा पर्दाफाश करत तेलंगणा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या बहुराज्य रॅकेटचा सूत्रधार असलेल्या राजस्थानातील राजू चेचानी ऊर्फ राजेंद्र चेचानी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल जप्त केला आहे. बनावट कंपन्या तेलंगणामार्गे नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली भागात आपला बोगसमाल आणि कीटकनाशके खपवत असतात. मोठ्या कंपनीच्या नावाने बोगसगिरी करणाऱ्या टोळीचा दक्षिण महाराष्ट्रातील व्यवसाय उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हैदराबाद पोलिसांनी २८ मे रोजी बनावट कृषी रसायने जप्त करण्यात यश मिळवले असून ही कारवाई राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील फार्महाऊसवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पार पडली.
या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी केलेल्या तपासानुसार चेचानी सात वर्षांहून अधिक काळ बनावट कीटकनाशकांचा व्यवसाय बेकायदेशीररित्या चालवत होता. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा एकूण ११ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो हे बनावट उत्पादने बनवून त्यावर प्रसिद्ध कंपन्यांची नक्कल केलेली लेबले चिकटवून बाजारात विकत होता.
चेचानीचे बस्सी येथील ‘महेश्वरी सीड्स अँड पेस्टिसाईड्स’ हे दुकान या सगळ्या नेटवर्कचा केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे. याच दुकानातून तो पॅकेजिंग मटेरियल, स्टॉक व इतर साहित्याचा पुरवठा करत होता. हैदराबादमध्ये जुलै २०२४ मध्ये ई राजेश नावाच्या व्यक्तीच्या गोदामात बनावट कीटकनाशके सापडल्यानंतर एलबीनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार ही सगळी साखळी उघडकीस आली. सुरुवातीला एक साधा नमुना आढळून आल्यापासून पोलीस तपास पुढे सरकत गेला आणि अखेरीस हे राष्ट्रीय पातळीवरील रॅकेट उजेडात आले. चेचानीविरुद्ध इतर अनेक राज्यांतही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याचा बेकायदेशीर व्यवसाय किती व्यापक होता आणि किती शेतकऱ्यांना याचा फटका बसला असेल, याचा अंदाज येतो.
विशेष म्हणजे या बनावट कीटकनाशकांचा प्रमुख पुरवठा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेषतः नांदेड, लातूर, सोलापूर आणि सांगलीसारख्या सीमावर्ती भागांत या बनावट रसायनांची आवक अधिक असल्याचे सांगितले जाते. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची मागणी असते. याचाच गैरफायदा घेत बनावट माल बाजारात मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येतो. हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकऱ्यांच्या जिवाशी, शेतीच्या उत्पादनक्षमतेशी आणि अन्नसुरक्षेशी जोडलेला आहे. अशा कारवायांमुळे जागरूकता वाढेल आणि अशा रॅकेटचा मुकाबला अधिक सशक्तपणे करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे








