लोणावळा / प्रतिनिधी :
नौदलात कमांडंट पदावर नोकरीस असल्याची बतावणी करून लोणावळा परिसरातील मुलांना आय.एन.एस. शिवाजी लोणावळा येथे नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रूपयांची मागणी करून ती रक्कम लाटणाऱ्या तोतया नौदल अधिकाऱ्याला त्याच्या दोन साथीदारांसह सापळा रचून अटक करण्यात आली.
आकाश काशिनाथ डांगे (वय 31, रा. भाडळी बु. फलटण सातारा), जयराज आनंदराव चव्हाण (26, रा. झिरपवाडी ता. फलटण, जि. सातारा) व अभय सेवागिरी काकडे (28, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ऍड. ऐश्वर्या कृष्णा लेंडघर (रा. भांगरवाडी लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी लेंडघर यांचा नोटरीचा व्यवसाय आहे. तोतया नौदल अधिकारी आकाश डांगे याने सप्टेंबर 2022 मध्ये नौदलाच्या गणवेशात येऊन लेंडघर यांच्याकडून त्यांनी 15 जणांची प्रतिज्ञापत्र बनवून घेतली. त्यानंतर ते वारंवार फिर्यादी यांच्या कार्यालयात येत. तसेच त्यांची ओळख वाढवून त्यांना लोणावळा परिसरातील तसेच त्यांच्या नातेवाईकांना नौदलात नोकरी लावण्याची गळ घालून एकूण 19 जणांना नौदलात विविध पदावर नोकरीस लावण्याच्या बदल्यात प्रत्येकी 3 लाख रूपये घेण्याची बोलणी केली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या आय. एन. एस. शिवाजी लोणावळा येथील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची भरती केली जात नसल्याचे समजल्याने फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधून आणखी एका मुलाला नोकरीस लावण्यासंदर्भात विचारणा केली. आरोपी त्यासाठी लगेचच तयार झाल्याने फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांशी संपर्क साधून आरोपी पैसे स्वीकारून नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याकरिता येणार असल्याचे कळविल्याने लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच आय.एन.एस. शिवाजी लोणावळा नेव्हल पोलीस टिम यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचला व सदर ठिकाणी छापा टाकला. यात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांच्या ताब्यातील कार. नं. एम. एच. 42 ए. आर. 2005 ही ताब्यात घेवून तिची झडती घेतली असता त्यामध्ये नौदलाचा पांढच्या रंगाचा डेस, पांढरा शूज, बेल्ट, नेमप्लेट तसेच इतर साहित्य व राजमुद्रा असलेली गाडीची नंबर प्लेट असे एकूण 15 लाख रूपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.








